आपण जेव्हा एखाद्या अपार्टमेंटमध्ये फ्लॅट घेतो तेव्हा खरेदीकरार पत्रातल्या अटी आणि नियमांचं वाचन नीट करतोच असं नाही. खरं तर या अटी आणि नियमांचं जाणकाराकडून वाचन करून करार नीट समजून घेणं आजच्या घडीला अत्यावश्यक झालं आहे.
देखभाल करार किंवा मेंटेनन्स ऍग्रीमेंटच्याबाबतीतही आपण नीट करार वाचूनच सहय़ा करायला हव्यात. खरेदीपत्र करार करताना मेंटेनन्स ऍग्रीमेंटही अमलात आणावा लागतो. मेंटेनन्स ऍग्रीमेंट महत्त्वाचा असून त्यात आपल्या अपार्टमेंटमध्ये असणाऱया सामायिक जागा, सेवा आणि सुविधा ज्या वापरणार असतो त्यासाठी फ्लॅटधारकांसाठी नियम व अटी असतात. जेव्हा बहुमजली इमारतीचा विचार येतो तेव्हा सामायिक जागा आणि सुविधांसाठी बेसमेंट (तळघर), पार्किंग, छत, जिना, सरकता जिना, पाण्याच्या टाक्या, खुल्या जागा आदींचा सहभाग असतो. या सर्व बाबतीत अपार्टमेंटमधील नेमून दिलेल्या सेक्रेटरी अथवा प्रमुखाने लक्ष घालून वेळोवेळी देखभालीची जबाबदारी उचलणे आवश्यक ठरते. जिन्यातील प्रकाशदिवे, जिन्यातील पायऱया, लिफ्ट, पॉवर बॅकअप, स्वच्छता, दुरूस्ती कामे, सुरक्षा यंत्रणा याबाबतीत लक्ष घालणं गरजेचं असतं. सामायिक जागांचा वापर हा त्या अपार्टमेंटमधील प्रत्येक फ्लॅटधारक वापरत असतो त्यामुळे या भागाची देखभाल करताना लागणारा खर्च सर्वांनी मिळून उचलणं गरजेचं असतं. नळ दुरूस्ती, पाणी पुरवठा करण्यासंबंधातील किंवा स्वच्छतेसाठी येणारा खर्च हा सर्वांनी सामायिक वाटून घ्यायचा असतो. त्य़ाशिवाय फ्लॅटधारकाने वेळच्यावेळी मेंटेनन्सचा मासिक अथवा वार्षिक खर्च देणं गरजेचं असतं. जे फ्लॅटधारक नियमीत मेंटेनन्स भरत नाहीत त्यांना इशारा देऊन त्यांचा पाणीपुरवठा, वीजपुरवठा तोडता येऊ शकतो. व्याज आणि दंडआकारणीनंतरच त्यांचा पाणीपुरवठा, वीजपुरवठा पुन्हा सुरू करता येतो. अपार्टमेंटमधील फ्लॅटमालकाने जर का आपला फ्लॅट भाडेकरूला दिला तर त्य़ाला मेंटेनन्स खर्चाची कल्पना लेखी देणे गरजेचे आहे. भाडे करारात ही बाब नमूद करणे आवश्यक असणार आहे. जेणेकरून मेंटेनन्स कुणी भरायचा असा वाद उभा राहणार नाही.
व्यावसायिक आणि रहिवासी (कमर्शियल कम रेसिडेन्शीयल) संकुलात किंवा इमारतीत घर किंवा फ्लॅट घेणार असाल तर मेंटेनन्सबाबतची प्रक्रिया किचकट असते. ती एखाद्या तज्ञाला विचारून घेतल्यानंतरच अशा प्रकल्पातील घर घ्यावं. अशा प्रकारच्या अपार्टमेंटमध्ये मेंटेनन्सची प्रक्रिया गुंतागुंतीची असू शकते. कार्यालयीन वेळेत आणि त्यानंतरच्या काळासाठी वेगवेगळे मेंटेनन्स करार असतात. व्यावसायिक तासात पार्किंग शुल्क, पॉवर बॅकअप शुल्क, विमा आदी जास्त असू शकतं. शिवाय व्यावसायिकांनाही आपला व्यवसाय चालवताना इमारतीतील रहिवाशांना कोणताही त्रास होणार नाही ही काळजी घेणं आवश्यक ठरणार आहे.