वार्ताहर / देवगड:
देवगडमध्ये रविवारी सकाळपासून इंटरनेट सेवा बंद पडल्याने शासकीय कार्यालये, बँकांमधील आर्थिक व्यवहार पूर्णतः ठप्प झाले. सोमवारी सायंकाळपर्यंत सेवा सुरळीत करण्यास येथील यंत्रणेला यश आले नाही. येथील बीएसएनएल कार्यालयात तांत्रिक विभागात कर्मचारीच नसल्यामुळे येथील सेवा वारंवार ठप्प होत आहे. बारा तासाहून अधिककाळ सेवा ठप्प झाली.
देवगड तालुक्यातील दूरध्वनी सेवा विस्कळीत होण्याचा प्रकार वारंवार होत आहे. येथील तालुका कार्यालयातच अधिकारीवर्गाची रिक्त पदे असल्यामुळे तांत्रिक बिघाड दुरुस्त करण्यासाठी सावंतवाडी येथून तांत्रिक विभागातील अधिकारी व कर्मचारीवर्गाला पाचारण करावे लागत आहे. रविवारी सकाळच्या सत्रापासून इंटरनेट सेवा पूर्णतः ठप्प झाली. सोमवारी दिवसभर ही सेवा बंद होती. याचा परिणाम शासकीय कार्यालयाबरोबरच बँकांच्या आर्थिक व्यवहारावर झाला. या इंटरनेट सेवेवर सुरू असणारी बँकांची एटीएम सेवा रविवारपासून बंदच आहे.
देवगड व जामसंडे शहरातील शेकडो घरगुती व व्यावसायिक दूरध्वनी गेल्या काही महिन्यापासून बंद आहेत. ही सेवा सुरळीत करण्यासाठी येथील कार्यालयात कर्मचारीवर्गच उपलब्ध नाही. एका कर्मचारीवर्गावर ही यंत्रणा दुरुस्त करण्यासाठी भार देण्यात आला आहे. ग्रामीण भागातील दूरध्वनी सेवाही तेथील दूरध्वनी केंद्रात कर्मचारीवर्ग नसल्यामुळे ठप्प आहे. तालुका कार्यालयातच मुख्यपदावरील अधिकारीवर्गाच्या जागा रिक्त आहेत. त्यामुळे सर्वच सेवा ठप्प झाली आहे. येथील कर्मचाऱयांना सावंतवाडी येथून मनुष्यबळ उपलब्ध झाल्यावर सेवा सुरळीत करता येते. तातडीने येथील पदे भरण्याची मागणी ग्राहकांमधून केली जात आहे.