मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ठाकुर, कोयंडे शिवबंधनात
प्रतिनिधी / देवगड:
देवगड-जामसंडे नगरपंचायतीतील भाजप नगरसेविका सौ. हर्षा ठाकुर व नगरसेवक विकास कोयंडे यांनी गुरुवारी सायंकाळी मुंबई येथे वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. न. पं. निवडणुकीच्या तोंडावर नगरसेवकांनी केलेला शिवसेना प्रवेश हा भाजप व आमदार नीतेश राणेंसाठी धक्का मानला जात आहे.
या प्रवेशावेळी पालकमंत्री उदय सामंत, शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दूधवडकर, जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत, आमदार वैभव नाईक, आमदार दीपक केसरकर, युवा सेनेचे ऍड. हर्षद गावडे, अतुल रावराणे, तालुकाप्रमुख विलास साळसकर, मिलिंद साटम, उपतालुकाप्रमुख बुवा तारी, अमोल लोके आदी उपस्थित होते.
महिनाभरापूर्वी भाजपाच्या नगरसेविका हर्षा ठाकुर, सौ. श्रृती जाधव व विकास कोयंडे यांनी पालकमंत्री सामंत यांच्या भेट घेतली होती. त्याचवेळी त्यांचा शिवसेनेत प्रवेश झाल्याच्या बातम्या सोशल मीडियावर प्रसिद्ध झाल्या होत्या. मात्र, त्यानंतर विकास कोयंडे व श्रृती जाधव यांनी आपण शिवसेनेत प्रवेश केला नसून विकासकामांसंदर्भात पालकमंत्र्यांची भेट घेतल्याचे घुमजाव केले होते. मात्र, सिंधुदुर्गात भाजपचे नेते व केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची जनआशीर्वाद यात्रा झाल्यानंतर शिवसेनेने त्यातील दोन नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश घडवून भाजपला पर्यायी राणेंना धक्का देण्याचा प्रयत्न केला आहे.
भाजपाच्या नगरसेविका ठाकुर यांनी आमदार राणे यांच्या भाजप प्रवेशापासून पक्षाशी फारकत घेतली. त्या भाजपच्या कुठल्याही कार्यक्रमांना उपस्थित राहत नव्हत्या व त्यांना निमंत्रण दिले जात नव्हते. त्यामुळे त्या भाजपमध्ये नाराज होत्या. अनेकवेळा त्यांनी आपली नाराजी उघडपणे व्यक्त केली होती. तर कोयंडे हे
काँग्रेसच्या चिन्हावर न. पं. मध्ये निवडून आल्यानंतर राणेंसोबत भाजपमध्ये होते. मात्र, त्यांच्या प्रभागात विकासकामे केली जात नसल्याने ते नाराज होते.
येडय़ांची जत्रा… नीतेश राणेंची टीका
दरम्यान, आमदार नीतेश राणे यांनी या प्रवेशासंदर्भात ट्विटरवरून ट्विट करत आपलेच नगरसेवक मुख्यमंत्र्यांकडे घेऊन जायचे आणि फोडले म्हणून उगाच कॉलर वर करून आपल्याच मुख्यमंत्री आणि पक्षप्रमुखाला वेडे बनवायचे. यालाच म्हणतात येडय़ांची जत्रा, असा टोला लगावला आहे.