‘ऑनलाईन’ विशेष सभेत निवड जाहीर : पाच वर्षात दुसऱयांदा नगराध्यक्षपदाची जबाबदारी
प्रतिनिधी / देवगड:
देवगड-जामसंडे नगर पंचायतीच्या नगराध्यक्षपदी प्रियांका प्रदीप साळसकर यांची बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी वैशाली राजमाने यांनी शुकवारी ‘ऑनलाईन’ पद्धतीने घेतलेल्या विशेष सभेत जाहीर केले. पाच वर्षात दुसऱयांदा नगराध्यक्ष होण्याचा मान साळसकर यांना मिळाला आहे. नगराध्यक्ष निवडीनंतर त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला.
नगराध्यक्षा प्रणाली माने यांनी पक्षाच्या आदेशानुसार सव्वा वर्षाचा कार्यकाल संपल्यानंतर त्यांनी नगराध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर रिक्त झालेल्या नगराध्यक्षपदाची निवडणूक घेण्यात आली. आगामी नगरपंचायत निवडणुका लक्षात घेऊन सक्षम नगराध्यक्ष असणे गरजेचे असल्याने व पहिल्या नगराध्यक्षपदाच्या कार्यकाळात उत्कृष्ट काम केल्याने माजी मुख्यमंत्री नारायण राणे व आमदार नीतेश राणे यांनी सौ. साळसकर यांना दुसऱयांदा नगराध्यक्षपदाची संधी दिली. शुक्रवारी नगराध्यक्षपदी अधिकृत निवड जाहीर झाल्यानंतर माजी आमदार ऍड. अजित गोगटे, भाजप जिल्हा चिटणीस बाळ खडपे, तालुकाध्यक्ष संतोष किंजवडेकर यांनी अभिनंदन केले. त्याचबरोबर गटनेते व माजी नगराध्यक्ष योगेश चांदोसकर, उपनगराध्यक्ष उमेश कणेरकर, माजी नगराध्यक्षा प्रणाली माने, नगरसेवक बापू जुवाटकर, सुभाष धुरी, संजय तारकर, नीरज घाडी, राजेंद्र वालकर, नगरसेविका प्राजक्ता घाडी, उज्वला अदम, विशाखा पेडणेकर, माजी नगरसेवक शरद ठुकरूल, विभाग अध्यक्ष ज्ञानेश्वर खवळे, मिलिंद माने, शिवाजी कांदळगावकर तसेच विविध स्तरातील मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या.
शहराच्या सर्वांगीण विकासासाठी कटीबद्ध!
यावेळी नूतन नगराध्यक्ष साळसकर म्हणाल्या, माजी मुख्यमंत्री नारायण राणे व आमदार नीतेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली आपण काम करणार आहोत. निवडणूक काळात जनतेला दिलेली आश्वासने सर्व नगरसेवक पूर्ण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. यापुढे देवगड, जामसंडे शहरातील विकासाची अपूर्ण कामे मार्गी लावली जातील. सर्व नगरसेवकांच्या सहकार्याने शहराचा सर्वांगीण विकास करू, असे सांगितले.