वार्ताहर / देवगड:
देवगड एस. टी. बसस्थानकातून सकाळच्या सत्रात सावंतवाडीला जाणारी बस नसल्यामुळे प्रवासीवर्गाची गैरसोय होत आहे. सकाळची देवगड-पणजी बस बंद असून त्याऐवजी त्याचवेळेत सावंतवाडीपर्यंत बस सोडण्याची मागणी प्रवासीवर्गातून केली जात आहे.
देवगड बसस्थानकातून सकाळी 6 वाजता सोडण्यात येणारी देवगड-पणजी ही बसफेरी कोरोनाच्या कारणास्तव परराज्यात सोडण्यात येत नाही. त्यामुळे या बसने कणकवली, ओरोस, कुडाळ, सावंतवाडी या ठिकाणी जाणाऱया प्रवासीवर्गासमोर समस्या निर्माण झाली आहे. पहाटेच्या दरम्यान प्रवास करून शासकीय व महाविद्यालयीन विद्यार्थी, वैद्यकीय उपचारासाठी जाणारे प्रवासीवर्ग यांना पुन्हा परतीच्या प्रवासाला ही बस सोयीची आहे. 7.50 वाजता देवगड-सावंतवाडी फेरी सुरू आहे. तसेच कणकवलीपर्यंत काही निवडक फेऱया सुरू आहे तरीही सकाळी 6 वा. च्या सुमारास सावंतवाडीपर्यंत फेरी सुरू केल्यास त्याला भारमानही प्राप्त होईल. ही बस सोडण्याची मागणी प्रवासीवर्गातून केली जात आहे.