रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरचा सलामीवीर देवदत्त पडिक्कलने मागील लढतीत भारतीय खेळाडूंतर्फे पदार्पणात सर्वाधिक धावा जमवणाऱया फलंदाजांच्या यादीत दुसरे स्थान संपादन केले. सनरायजर्स हैदराबादविरुद्ध खेळताना त्याने 56 धावांचे योगदान दिले. आयपीएल पदार्पणात सर्वाधिक धावा जमवणाऱया भारतीय खेळाडूंच्या यादीत गोव्याचा स्वप्नील अस्नोडकर अव्वलस्थानी असून 2008 च्या हंगामात राजस्थान रॉयल्सतर्फे केकेआरविरुद्ध त्याने 60 धावांची खेळी साकारली होती. या यादीत मुंबई इंडियन्सचा अम्बाती रायुडू तिसऱया स्थानी असून त्याने 2010 साली राजस्थान रॉयल्सविरुद्ध 55 धावांची खेळी साकारली होती. सीएसकेचा विद्युत शिवरामकृष्णनने 2008 आयपीएल हंगामात डेक्कन चार्जर्सविरुद्ध 54 धावा जमवल्या. तो या यादीत चौथ्या स्थानी आहे.
कोण आहे देवदत्त पडिक्कल?
20 वर्षीय देवदत्त पडिक्कल हा मूळचा कर्नाटकाचा. त्याचा जन्म केरळमध्ये झाला. मात्र, नंतर त्याचे कुटूंब हैदराबादमधून बेंगळूरला स्थायिक झाले. 2017 कर्नाटक प्रीमियर लीग स्पर्धेत वयाच्या 17 व्या वर्षी त्याने लक्षवेधी खेळ साकारला. बेंगळूर ब्लास्टर्सविरुद्ध 53 चेंडूत 72 धावांची आतषबाजी त्याला प्रकाशझोतात आणणारी ठरली. यू-19 वयोगटात त्याला सातत्य राखता आले नाही. पण, कूचबिहार चषक स्पर्धेत त्याने 829 धावांची आतषबाजी करत आपली कारकीर्दही ट्रकवर आणली. प्रथमश्रेणी, लिस्ट ए व टी-20 पदार्पणातही अर्धशतक झळकावण्याचा विक्रम त्याच्या खात्यावर आहे. गतवर्षी त्याला प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पणाची संधी मिळाली. देवदत्तने रणजी क्रिकेट स्पर्धेत 128 चेंडूत 77 धावांची आतषबाजी केली, त्यावेळी कर्नाटक संघाने महाराष्ट्रावर 7 गडी राखून मात केली होती. पुढे 2020 आयपीएल हंगामासाठी त्याला आरसीबीने करारबद्ध केले.
देवदत्तसाठी 2019 चे वर्ष कलाटणी देणारे
2019 चे वर्ष देवदत्तच्या कारकिर्दीला विशेष कलाटणी देणारे ठरले. त्याने विजय हजारे 50 षटकांची क्रिकेट स्पर्धा व सय्यद मुश्ताक अली टी-20 चषक स्पर्धेत सर्वाधिक धावा जमवल्या आणि या दोन्ही स्पर्धा कर्नाटकाने जिंकल्या. देवदत्तने विजय हजारे स्पर्धेत 609 तर सय्यद मुश्ताक अली स्पर्धेत 580 धावांची आतषबाजी केली होती. पुढे कर्नाटक प्रीमियर लीग स्पर्धेत तो उदयोन्मुख खेळाडू पुरस्काराचा मानकरी ठरला. आतापर्यंत 15 प्रथमश्रेणी लढतीत त्याने 34.88 च्या सरासरीने 907 धावांचे योगदान दिले असून 13 लिस्ट ए सामन्यात त्याने 59.09 च्या सरासरीने 650 धावांची आतषबाजी केली आहे.
पदार्पणात अर्धशतक झळकावणारा पाचवा खेळाडू
देवदत्त 20 वर्षे 76 दिवसांचा असताना आयपीएल पदार्पणात अर्धशतक झळकावणारा तो दुसरा सर्वात तरुण फलंदाज ठरला. माजी आरसीबी खेळाडू श्रीवत्स गोस्वामीने 2008 मध्ये 19 वर्षे 1 दिवसांचा असताना पदार्पणात अर्धशतक झळकावले होते. याशिवाय, आरसीबीतर्फे आयपीएल पदार्पणात अर्धशतक फटकावणारा तो आजवरचा पाचवा फलंदाजही ठरला. यापूर्वी ख्रिस गेल, एबी डीव्हिलियर्स, युवराज सिंग व श्रीवत्स गोस्वामी यांनी असा पराक्रम गाजवला आहे.