प्रतिनिधी / बेळगाव
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळण्याच्या हेतूने देवदर्शनांवर सध्या प्रतिबंध घालण्यात आला आहे. बेळगावमधील कपिलेश्वर मंदिरासह सौंदत्ती यल्लम्मा देवस्थान, रायबाग येथील मायक्का चिंचली, गोडची येथील वीरभद्र देवस्थान, बाळेकुंद्री येथील पंतबाळेकुंद्री देवस्थान व बेळगावचे हरिमंदिर या अ श्रेणीतील मंदिरांमध्ये सध्या भाविकांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे.
त्याचप्रमाणे बडकुंद्री व हुक्मकेरी येथील देवस्थान, मंगसुळी येथील मल्लय्या देवस्थान, बेळगावच्या हेडक्वॉर्टर्समधील वीरभद्र देवस्थान, खिळेगाव येथील देवस्थान, बेळगावचे साई मंदिर या मंदिरांमध्येही प्रवेश बंदी करण्यात आली आहे. दरम्यान 21 आणि 22 रोजी दक्षिण काशी समजल्या जाणाऱया कपिलेश्वर मंदिरातील कालसर्प शांतीचा विधीसुद्धा पुढे ढकलण्यात आला आहे.
या शिवाय ज्या मंदिरांमध्ये लक्षणीय गर्दी होते अशा मंदिरांमध्ये मंदिर व्यवस्थापनाने निर्णय घेऊन भाविकांच्या देवदर्शनावर तात्पुरती स्थगिती आणावी. भाविकांच्या श्रद्धेचा पूर्ण आदर करून त्यांच्या सुरक्षिततेच्यादृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे, असे धर्मादाय आयुक्त रवी कोटारगस्ती यांनी ‘तरुण भारत’शी बोलताना सांगितले.
यल्लम्मा मंदिरात भाविकांना मनाई
त्याचबरोबर सौंदत्ती येथील यल्लम्मा मंदिरात कोणत्याही भाविकाला प्रवेश करण्यास गुरुवारपासून मनाई करण्यात आली आहे. यापूर्वी भाविकांना मास्क देऊन दर्शनास पाठविण्यात येत होते. परंतु परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी ‘तरुण भारत’शी बोलताना सांगितले.