योगी आदित्यनाथ सरकारचा महत्त्वाचा निर्णय
वृत्तसंस्था / लखनौ
उत्तरप्रदेशातील योगी आदित्यनाथ सरकार देवबंदमध्ये एटीएस कमांडो सेंटर स्थापन करणार आहे. मुख्यमंत्र्यांचे माध्यम सल्लागार शलभ मणि त्रिपाठी यांनी एका ट्विटद्वारे याची माहिती दिली आहे. या सेंटरमध्ये राज्यातील निवडक 18 एटीएस अधिकाऱयांना नियुक्त केले जाणार आहे.
तालिबानच्या क्रौर्यादरम्यान उत्तरप्रदेशात योगींनी तत्काळ प्रभावाने ‘देवबंद’मध्ये एटीएस कमांडो सेंटर सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. युद्धपातळीवर याचे काम देखील सुरू झाल्याचे त्रिपाठी यांनी म्हटले आहे.
देवबंदमध्ये या सेंटरकरता 2 हजार चौरस फूटांचा भूखंड वितरित करण्यात आला आहे. पण देवबंदपूर्वी लखनौ आणि नोएडामध्ये देखील कमांडो सेंटर सुरू करण्याची तयारी चालली आहे. नोएडामध्ये आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि लखनौमध्ये अमौसी विमानतळानजीक हे सेंटर असणार आहे.
उत्तरप्रदेशच्या सहारनपूर जिल्हय़ातील देवबंद हे ठिकाण इस्लामिक शिक्षणाचे एक मोठे केंद्र मानले जाते. पण मागील काही वर्षांमध्ये सुरक्षा यंत्रणांनी देवबंदची पार्श्वभूमी असलेल्या अनेक दहशतवाद्यांना जेरबंद केले आहे. 2019 मध्ये एटीएसने जैश-ए-मोहम्मदचे दोन दहशतवादी जेरबंद येथून ताब्यात घेतले होते. तसेच तेथे बांगलादेशी आणि आयएसएसआय हस्तकही पकडले गेले आहेत.