दहा दिवसांच्या चिमुरडीसह फर्नांडिस कुटुंबीय बचावले
सिलिंडरच्या स्फोटाने घराला तडे
दहा लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज
डिंगेवाडी येथील घटना
प्रतिनिधी / देवबाग:
देवबाग-डिंगेवाडी येथे रविवारी सकाळी 11 च्या सुमारास शॉर्टसर्किटने लागलेल्या आगीत जुजे फर्नांडिस यांचे चिरेबंदी घर भक्ष्यस्थानी पडले. त्यात त्यांचे दहा लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. भीषण आगीत घरातील सर्व साहित्य जळाल्यामुळे व्यवसायाने पारंपरिक मच्छीमार असलेल्या फर्नांडिस कुटुंबियांचा संसार उघडय़ावर आला. आगीच्या धुराचे लोट समुद्र किनाऱयावरून दूरपर्यंत दिसत होते. घरातील स्वयंपाक खोलीतील सिलिंडरच्या स्फोटामुळे आग अधिकच भडकली अन् मदतकार्यात अडचणी आल्या. सुदैवाने स्फोटामुळे कोणालाही दुखापत झाली नाही. मात्र, आगीवर नियंत्रण आणणे कठीण झाले होते.
रविवारी सकाळी 11 च्या सुमारास घरातील वीज मीटरजवळ शॉर्टसर्किट झाले आणि घराला आग लागली. आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी पाण्याची मोटार सुरू करण्याचा प्रयत्न करण्यात आला. परंतु, तात्काळ वीजपुरवठा खंडित झाल्याने आगीवर नियंत्रण मिळविणे अशक्य झाले. यावेळी किचनमधील वस्तुंनीही पेट घेतला. माहिती समजताच गावातील लोकांनी धाव घेतली. फर्नांडिस यांचे घर समुद्राला लागूनच आहे. ग्रामस्थांनी मिळेल त्या साधनांचा वापर करून समुद्राच्या पाण्याचा वापर करत आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले.
घरातील सिलिंडरचा स्फोट
घराला आगीने वेढल्या नंतर स्वयंपाक घरातील चीजवस्तुंनीही पेट घेतला. त्यावेळी स्वयंपाकघरात असलेला घरगुती सिलिंडरचाही स्फोट झाला. त्यामुळे घराच्या भिंतींनाही तडे गेले. सुदैवाने स्फोटात कुणालाही दुखापत झाली नाही. यावेळी नीलेश सामंत, नादार तुळसकर, संतान फर्नांडिस, शावियार फर्नांडिस, एन्जॉय तुळसकर, डॅनिस लॉड्रिक्स, लॉएट शिवलकर, नागेश चोपडेकर, फिल्सू फर्नांडिस, मकरंद चोपडेकर आदी ग्रामस्थांनी मदतकार्य केले. कुडाळ येथून अग्निशमन बंब मागविला होता. मात्र, ग्रामस्थांनी शर्थीचे प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळविल्यावर बंब दाखल झाला. ग्रामस्थांनी समुद्राचे पाणी, रेती मारून तसेच मिळेल त्या साधनांनी पाणी उपसा करून आगीवर नियंत्रण मिळविले.
शासकीय यंत्रणेकडून तात्काळ पंचनामा
आग आटोक्यात आणल्यानंतर शासकीय यंत्रणेकडून तात्काळ पाहणी करून नुकसानीच्या पंचनाम्याला सुरुवात करण्यात आली. यावेळी पोलीस पाटील भानुदास येरागी, पंचायत समिती सदस्या मधुरा चोपडेकर, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सचिन चव्हाण, तमास फर्नांडिस, वायरी तलाठी व्ही. एम. राठोड, वायरमन सिद्धेश परब, गौरव मोंडकर, देवबाग सरपंच जान्हवी खोबरेकर आदी उपस्थित होते.
फर्नांडिस यांचे घर उभारायला मदतीचे आवाहन
यावेळी देवबाग ग्रामपंचायतीतर्फे फर्नांडिस कुटुंबाला तातडीची मदत म्हणून 15 हजार रुपयांचा चेक देण्यात आला. शिवसेना मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी दहा हजारांची मदत दिली. तहसीलदार अजय पाटणे यांनीही घटनेची माहिती मिळताच प्रशासकीय यंत्रणेला आवश्यक सूचना दिल्या. जास्तीत जास्त आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे तहसीलदार पाटणे यांनी स्पष्ट केले. सुके मासे विकून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱया फर्नांडिस कुटुंबियांचे घर पुन्हा उभे करण्यासाठी मदतीचे आवाहन करण्यात येत आहे.
सोन्याचे मंगळसूत्रही जळाले
आगीच्या ज्वाळांनी काही क्षणात होत्याचे नव्हते केले. आयुष्यभर खस्ता खाऊन उभा केलेला संसार काही क्षणात जळून खाक झाला. रोख रक्कम, सामान आणि अन्नधान्य या आगीत नष्ट झाल्याने फर्नांडिस कुटुंबीय हतबल झाले आहे. आगीत घरातील सगळय़ा वस्तू जळून खाक झाल्या. यात जुजे यांची पत्नी गिलेरीन यांचे चार तोळय़ांचे सोन्याचे मंगळसूत्रही जळून खाक झाले. घरातील अन्नधान्य, कपडे, कपाट, विद्युत साहित्य, भांडी, मासेमारीची जाळी तसेच व्यवसायातील काही रोख रक्कम मिळून सुमारे 10 लाख 30 हजार रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.
आठ दिवसांची चिमुरडी होती घरात
घराला आग लागली, तेव्हा घरातील सर्वच सदस्य घरात कोणते ना कोणते काम करण्यात व्यस्त होते. यावेळी जुजे फर्नांडिस यांच्यासह त्यांची पत्नी गिलेरीन, मुलगा संतान, भावजय सिंपलीस आणि तिची आठ दिवसांची मुलगी घरात होती. सिंपलीस या आपल्या छोटय़ा मुलीला घेऊन जुजे यांच्या घरी आल्या होत्या. घराला आग लागल्याचे लक्षात येताच बालिकेसह सर्व कुटुंब घराबाहेर पडले. यामुळे यात कोणालाही दुखापत झाली नाही. मात्र, डोळय़ादेखत संसाराची राख झाली होती. हताशपणे फर्नांडिस कुटुंबीय याकडे पाहत होते. फर्नांडिस कुटुंबियांचे दु:ख पाहून अनेकांना अश्रू अनावर झाले.