तातडीने बससेवा सुरू करण्याची मागणी
वार्ताहर / सांबरा
सीबीटी-देवरवाडी-महिपाळगड ही बससेवा बंद केल्याने ग्रामस्थांची व विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे. त्यामुळे संबंधित अधिकाऱयांनी तातडीने सदर बससेवा सुरू करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
सीबीटी ते देवरवाडी-महिपाळगड बससेवा ही गेल्या साठ वर्षांपासून कार्यरत आहे. या बससेवेचा लाभ तीर्थक्षेत्र वैजनाथला जाणाऱया भाविकांनाही होत होता. देवरवाडी-महिपाळगड येथून बेळगावला शिक्षण घ्यायला येणाऱया विद्यार्थ्यांनाही ही बसेसवा उपयुक्त ठरली होती. मात्र, लॉकडाऊनच्या काळात ही बससेवा बंद करण्यात आली. त्यानंतर ही बससेवा चालू करणे गरजेचे होते. मध्यंतरी केवळ आठ दिवसच बससेवा सुरू केली. त्यानंतर पुन्हा बससेवा बंद करण्यात आली. त्यामुळे विद्यार्थी, कामगारवर्ग व ग्रामस्थांना खासगी प्रवासी वाहतुकीवर अवलंबून राहावे लागत आहे. याबाबत अनेकदा डेपोमध्ये कळवूनदेखील डेपो मॅनेजर याकडे दुर्लक्ष करीत आहेत. डेपो मॅनेजर उडवाउडवीची उत्तरे देऊन बससेवा सुरू करण्यासाठी टाळत आहेत. तरी संबंधित लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष घालून बससेवा सुरू करावी, अशी मागणी प्रवाशांतून होत आहे.