वार्ताहर/ ताम्हाने
देवरुख व साडवली परीसरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता ही साखळी तोडण्यासाठी देवरुख नगरपंचायत हद्दीतील व्यापारी व नागरीकांनी गुरुवार 27 ते गुरुवार 3 सप्टेंबर या कालावधीत लॉकडाऊन म्हणजेच जनता कर्फ्यु लागु केला आहे. याला शुक्रवारी दुसऱया दिवशीही चांगला प्रतिसाद मिळाला आहे. मात्र शहरात काही प्रमाणात वाहनांची ये-जा सुरु होती.
देवरुख बाजारपेठ बंद ठेवावी का यासाठी नगराध्यक्षा सौ.मृणाल शेटय़े यांनी नगरपंचायतीत व्यापारी व नागरीकांची बैठक बोलवलेली होती. याच बैठकीत दुकाने व व्यवहार बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार आठ दिवसांचा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. लॉकडाऊन काळात मेडीकल सेवा नियम व अटी पाळुन सुरु राहणार आहे. आपल्या आरोग्याची काळजी घेवुन आपणच योग्य तो निर्णय घ्यायचा आहे असे सुचित करण्यात आले आहे.
नागरीकांनी सहकार्य करण्याचे आवाहन नगराध्यक्षांनी केले आहे. नागरिकांनीही नगराध्यक्षांच्या या आवाहनाला पहिल्या दिवशी प्रतिसाद दर्शवत नियमांचे पालन केले. तर शुक्रवारी दुसऱया दिवशीही या लॉकडाऊनला प्रतिसाद दिसून आला, मात्र शहरातून दिवसभर काही प्रमाणात वाहनांची ये-जा सुरु होती.
शहरातील काही बँकांनी लॉकडाऊनला पाठींबा दर्शवत बँक बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. मात्र ग्राहकांची होणारी गैरसोय लक्षात घेवून लॉकडाऊनच्या दुसऱया दिवशी शहरातील बँका सुरु ठेवण्यात आल्या.