वार्ताहर/ ताम्हाने
जिल्हय़ातील पहिल्या व्यावसायिक शिक्षण केंद्राच्या इमारतीचे भूमिपूजन बुधवार दि.16 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजता होणार आहे. देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाला याची मान्यता मिळाली आहे. व्यावसायिक शिक्षण संबंधीचे उपक्रम (बी व्होक) राबवायला यु.जी.सी.कडून परवानगी मिळाली आहे.
भुमिपूजन समारंभाला मानद अध्यक्ष व देणगीदार बाळासाहेब जोशी प्रमुख पाहूणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. संस्थाध्यक्ष सदानंद भागवत यांच्याहस्ते भूमिपूजन होणार आहे. या अभ्यासक्रमासाठी लागणारी इमारत सव्वाकोटी रुपयांची असून सव्वा कोटी रुपये आतील साधनसामुग्रीसाठी खर्च होणार आहेत. देणगीदार बाळासाहेब जोशी यांनी इमारतीसाठी 1 कोटी देणगी जाहीर केली आहे.
याच दिवशी सायंकाळी 4 वाजता संस्थेचा स्थापनादिन समारंभ होणार आहे. हा समारंभ महाविद्यालयाच्या सेमिनार हॉलमध्ये होणार आहे. यावेळी सहकार क्षेत्रातील अग्रणी दीपक पटवर्धन तसेच प्रख्यात कॅन्सर सर्जन डॉ.रघुनाथ रानडे यांची उपस्थिती लाभणार आहे. या दोन्ही कार्यक्रमाला उपस्थित रहावे असे आवाहन सदानंद भागवत यांनी केले आहे.