शेल्डे सातेरी देवस्थानचे माजी अध्यक्ष समीर गावस देसाई यांचे स्पष्टीकरण : महाजन सभा होण्यापूर्वीच आरोप करणे गैर
प्रतिनिधी /कुडचडे
शेल्डे, केपे येथील श्री सातेरी ग्रामदेवी देवालयाचे महाजन प्रकाश गावस देसाई, प्रशांत गावस देसाई यांनी इतर काही महाजनांना घेऊन 24 जून रोजीच्या पत्रकार परिषदेत कार्यरत समितीने देवस्थानच्या पैशांत घोळ केल्याचा जो आरोप केला तो चुकीचा आहे. कारण महाजनांनी दिलेल्या तक्रारीची दखल घेत न्यायालयाने तक्रारीत जे नमूद केले आहे त्यावर खुलासा महाजन सभा घेऊन स्पष्ट करावा असे आदेश दिला होता. पण वरील महाजनांनी महाजन सभा व्हायच्या अगोदरच कुडचडेत जाऊन पत्रकार परिषद घेतली व देवस्थानचा तसेच समितीचा अपमान केला. हा त्यांचा अपराध आहे, असे माजी अध्यक्ष समीर गावस देसाई यांनी स्पष्टीकरण देण्यासाठी घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले.
याच कारणास्तव आपल्याला सविस्तर माहिती महाजनांपुढे मांडण्यास मिळाली नाही. तसेच कोविड महामारीमुळे अजूनपर्यंत सभा घेण्यात आलेली नाही. म्हणून ही पत्रकार परिषद घेऊन सत्य परिस्थिती सांगावी लागत आहे. ज्या प्रकारे सदर पत्रकार परिषदेत महाजनांनी सांगितले त्यात कोणतेच तथ्य नसून जो आरोप केला आहे तो फक्त आपली बदनामी व्हावी म्हणून केलेला आहे. त्यावर आपण मुख्य मुद्दे सोडून अन्य कोणतेच स्पष्टीकरण देणे उचित समजत नसून जेव्हा महाजन सभा होणार तेव्हा आपण जो चोख व्यवहार केलेला आहे त्याचे स्पष्टीकरण देणार आहे. त्यानंतर जर आपण सादर केलेल्या अहवालात व आपण दिलेल्या स्पष्टीकरणात जे सांगितले आहे ते खोटे ठरले, तर पुढे महाजन सांगतील ते करण्यास आपण तयार आहे, असे गावस देसाई यांनी सांगितले. यावेळी त्यांच्यासोबत महाजन महेंद्र गावस देसाई हे उपस्थित होते.
जून महिन्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत प्रशांत गावस देसाई यांनी आपण लाखो रुपयांची उलाढाल केल्याचा आरोप केला आहे. त्यात तथ्य नसून त्यांनी संबंधित बँकेचा अहवाल घेऊन त्यावर प्रत्यक्षात स्पष्टीकरण घ्यायला हवे होते. पण ते न करता त्यांनी सदर विषय पत्रकार परिषद घेऊन मांडला. ही त्यांनी मोठी चूक केलेली आहे. यावर त्यांच्याबरोबर असलेल्या महाजनांनी व प्रत्येकाने विचार करणे आवश्यक आहे, असे समीर गावस देसाई पुढे म्हणाले.
काम जास्त केलेले नाही
त्याचबरोबर त्यांनी अन्य एका विषयावर बोलताना दावा केला की, 18 लाखांचे काम जास्त करण्यात आले आहे. पण तसे झालेले नसून समितीने सरकारकडून 54 लाखांचे काम करणार म्हणून मंजुरी घेतली होती. त्यानंतर सदर कामासाठी देवस्थानचे फक्त 22 लाख रु. खर्च केले व राहिलेला खर्च देणगी रूपाने आलेल्या पैशांतून केलेला आहे. तसेच त्यावेळी समितीकडून निर्णय घेण्यात आला की, देवस्थानचा निधी न वापरता बँकेतून कर्ज घ्यावे व ज्या देणग्या येणार त्या कर्ज फेडण्यासाठी वापराव्यात. त्याप्रमाणे कर्ज घेण्यात आले होते, असे समीर गावस देसाई यांनी सांगितले.
तसेच त्याप्रमाणे एका भाविकाने देवस्थानला 25 लाखांची देणगी देण्याचे ठरविले होते. त्यानुसार त्यांनी सात लाखांची रक्कम दिली होती. त्यानंतर वैयक्तिक कारणास्तव त्यांनी उर्वरित रक्कम दिली नाही. त्यानंतर 2018 सालापासून सदर महाजनांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. त्यामुळे देणग्या देणाऱयांची संख्या कमी झालेली आहे, असे समीर गावस देसाई यांनी यावेळी सांगितले. तसेच त्यांनी दावा केला आहे की, घोटाळय़ाच्या मुद्दय़ात तथ्य असल्यामुळे आपण अध्यक्षपपदाचा राजीनामा दिला. पण ते तसे नसून जेव्हा न्यायालयाने चौकशी करण्यात यावी असा आदेश दिला तेव्हा आपण अध्यक्षपदावर राहून सदर चौकशी करू शकत नसल्यामुळे त्यावेळी आपण राजीनामा दिला, असे त्यांनी स्पष्ट केले.
याअगोदर 2016 साली आपण अध्यक्षपदावर होतो. त्यानंतर 2018 साली त्यांनी तक्रार दाखल केली. 2019 साली आपण परत बिनविरोध निवडून आलो. पण यापुढे आपण हे पद घेणार नसून अन्य महाजनांना ही संधी देण्याचा प्रयत्न करणार आहे. आज आपल्याला अत्यंत वाईट वाटते की, या गोष्टी प्रसारमाध्यमातून उघड कराव्या लागत आहेत. पण त्या महाजनांनी अशी वेळ आणल्यामुळे हे करावे लागत आहे, असे ते म्हणाले. ज्यावेळेस सदर प्रशांत गावस देसाई अध्यक्षपदावर होते तेव्हा कोणतीच परवानगी न घेता त्यांनी देवीचे सोने सोनाराजवळ नेऊन त्याच्या दोन सोनसाखळय़ा करून आणल्या होते. पण जे जुने सोने सोनाराजवळ देण्यात आले होते त्याचे मूल्य काय होते व त्याचे वजन काय होते हे कुणालाच माहिती नव्हते, असा दावा समीर गावस देसाई यांनी केला. म्हणून आपण या माध्यमातून देवीच्या सदर अलंकारांची चोरी केल्याचा आरोप करून यासंदर्भात सखोल चौकशी करावी अशी मागणी महाजनांकडे करतो, असे त्यांनी पुढे सांगितले.