आज आदेश जारी होणार
प्रतिनिधी /पणजी
येत्या रविवारी दि. 13 फेब्रुवारी 2022 रोजी होणाऱया देवस्थान समितीच्या निवडणुका पुढे ढकलल्या जाणार असून या संदर्भात आदेश आज बुधवारी जारी होणार आहे.
दि. 14 फेब्रुवारी 2022 रोजी विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. या दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली असून त्यादिवशी कोणतीच शासकीय कामे होऊ शकत नाहीत.
देवस्थान समितीच्या निवडणुका मामलेदारांच्या निगराणीत होतात. मामलेदारांचा प्रतिनिधी निर्वाचन अधिकारी म्हणून काम पाहतो. विधानसभा निवडणुकीत मामलेदार कार्यालय व्यस्त असणार आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या आदल्या दिवशी निवडणूक घेणे शक्य होणार नाही.
विधानसभा निवडणुका जाहीर होण्यापूर्वी देवस्थानच्या निवडणुका जाहीर झाल्या होत्या. विधानसभा निवडणुका जाहीर झाल्यामुळे आचारसंहिता लागू झाली. या आचारसंहितेच्या काळात सरकारला कुठलाही निर्णय घ्यायचा झाल्यास निवडणूक आयोगाची मान्यता घ्यावी लागते. त्याप्रमाणे देवस्थानच्या निवडणुका पुढे ढकलण्यासाठी मान्यता मागणारी फाईल आयोगाकडे पाठविण्यात आली आहे. बुधवारपर्यंत मान्यता आल्यास लगेच देवस्थान निवडणुका पुढे ढकलण्याचा आदेश जारी केला जाईल, असे सरकारी सूत्रांनी सांगितले.
कोमुनिदाद निवडणुका जानेवारीत ठरल्या होत्या, पण कोविडची तिसरी लाट आल्यामुळे उच्च न्यायालयाने हस्तक्षेप करून कोमुनिदाद निवडणुका स्थगित ठेवल्या होत्या. आता विधानसभा मतदानानंतरच देवस्थान व कोमुनिदाद निवडणुका होणार आहेत.