कोडीबाग येथील खापरी देवस्थानची यात्रा उत्साहात : स्थानिकांसह गोवा-महाराष्ट्रातील भाविकांची उपस्थिती
प्रतिनिधी /कारवार
एखाद्या देवाला मद्याचा अभिषेक, सिगारेटची आरती आणि मांसाचा नैवेद्य अर्पण करून यात्रोत्सव साजरा करण्यात आला, असे सांगितल्यास कुणाचा विश्वास बसणार नाही. देवाला मद्य, सिगारेट आणि मांस अर्पण करण्याची प्रथा विचित्र आणि थोडीशी अविश्वसनीय वाटली तरी खरी आहे. येथील कोडीबाग (काळी नदीवरील पुलाजवळ) खापरी देवस्थान आहे. देवस्थानातील देवाचे नाव खापरी असे आहे. या वैशिष्टय़पूर्ण देवस्थानचा यात्रोत्सव रविवारी रात्री मोठय़ा उत्साहात झाला. यात्रोत्सवात केवळ स्थानिकच नव्हे तर गोवा आणि महाराष्ट्रातील भाविक मोठय़ा संख्येने सहभागी झाले होते.
देवाला पुष्पहार, फुले, फळफळावळसह मद्य, सिगारेट आणि मांस अर्पण करून दर्शन आणि नवस फेडण्यासाठी श्रद्धाळूंची मोठी गर्दी झाली होती. यावेळी तुलाभार आदी कार्यक्रम झाले. श्रद्धाळूंनी मांस, मद्य आदी प्रसादरुपाने स्वीकारून देवाच्या आशीर्वादाला पात्र होण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे दिसून येत होते.
या देवस्थानाबद्दल समजलेली माहिती अशी, सुमारे शंभर-सव्वाशे वर्षांपूर्वी दक्षिण आफ्रिकेतून आलेली एक व्यक्ती सध्या देवस्थान असलेल्या ठिकाणी झोपडीत वास्तव्य करून होती. त्या आफ्रिकन व्यक्तीचे नाव खापरी असे होते. ती व्यक्ती अतिशय परोपकारी वृत्तीची होती. जनतेच्या समस्यांच्या वेळी ते धावून जात होते. त्यामुळे त्या व्यक्तीला तत्कालिन जनता ‘गरिबांचा रक्षक’ म्हणून ओळखत होती. इतकेच नव्हे तर काही जणांना देव बनून राहिले होते. एकेदिवशी ती व्यक्ती अचानकपणे बेपत्ता झाली. बेपत्ता झालेल्या त्या व्यक्तीचा शोध लावण्याचा प्रयत्न करण्यात आला, पण प्रयत्नांना यश आले नाही. बेपत्ता झालेल्या व्यक्तीवर स्थानिकांची अपार श्रद्धा होती. एकेदिवशी परसप्पा नावाच्या व्यक्तीच्या स्वप्नात ती व्यक्ती आली आणि आपणासाठी एक झोपडी बांधून देण्याची मागणी केली. इतकेच नव्हे तर आपणाला मद्य, सिगारेट आणि मांस अर्पण करण्याची मागणी केली. त्यानुसार परसप्पा यांनी झोपडी बांधली आणि झोपडीमध्ये दगडाच्या मूर्तीची प्रति÷ापना केली. त्या दिवसापासून ती मूर्ती खापरी देवता म्हणून ओळखायला सुरुवात झाली. पुढे खापरी देवाच्या मार्च महिन्यातील रविवारी यात्रोत्सवाची परंपरा सुरू झाली. प्रत्येक रविवारी खापरी देवाच्या दर्शनासाठी श्रद्धाळू दाखल होत असतात. काही वर्षांपूर्वी देवस्थानचा लाखो रुपये खर्च करून जीर्णोद्धार करण्यात आला आहे. आता झोपडीच्या ठिकाणी आकर्षक मंदिराने आकार घेतला आहे. अलीकडच्या काळात यात्रोत्सवाच्या वैभवातही भर पडली आहे.