पद्म पुरस्कारांमध्ये 9 क्रीडापटूंचा सन्मान, गोव्याचे माजी फुटबॉलपटू ब्रह्मानंद शंखवाळकर यांचाही गौरव
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
स्टार पॅरा ऍथलिट देवेंद्र झाझरियाला प्रतिष्ठेचा पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाला असून ऑलिम्पिक सुवर्णजेता भालाफेकपटू नीरज चोप्रासह 9 क्रीडापटू पद्म पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत. भारतीय फुटबॉल संघाचे माजी कर्णधार व सर्वोत्कृष्ट गोलरक्षक ब्रह्मानंद शंखवाळकर यांनाही पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे.
42 वर्षीय देवेंद्र झाझरियाने 2004 ऍथेन्स व 2016 रिओ पॅरालिम्पिक्स स्पर्धेत भालाफेकीत 2 सुवर्णपदकांची कमाई केली. याशिवाय, गतवर्षी टोकियो पॅरालिम्पिक्समध्येही तो एफ46 इव्हेंटमध्ये रौप्यपदकाचा मानकरी ठरला.
टोकियो ऑलिम्पिक्स इतिहासात एखाद्या ट्रक अँड फिल्ड इव्हेंटमध्ये ऐतिहासिक सुवर्ण जिंकून देणारा पहिला भारतीय ठरलेल्या भालाफेकपटू नीरज चोप्रा पद्मश्री पुरस्काराचा मानकरी ठरला. नेमबाज अभिनव बिंद्रानंतर नीरज वैयक्तिक ऑलिम्पिक सुवर्ण जिंकणारा केवळ दुसरा भारतीय आहे. नीरजला याशिवाय परम विशिष्ट सेवा पदकाने देखील सन्मानित केले जाईल.
‘पद्मश्री आणि परम विशिष्ठ सेवा पदक मिळाले, हा मी माझा गौरव मानतो. देशवासियांच्या शुभेच्छा व आशीर्वादाबद्दल मी सर्वांचा मनापासून आभारी आहे. यापुढेही सातत्याने मेहनत घेण्यावर माझा भर असेल’, असे सध्या अमेरिकेत सराव करत असलेल्या नीरजने ट्वीट केले.
अन्य पुरस्कार जेत्यांमध्ये 20 वर्षीय पॅरा-शूटर अवनी लेखरा, पॅरा बॅडमिंटनपटू प्रमोद भगत, पॅरा भालाफेकपटू सुमित अन्तिल यांचा समावेश आहे. 93 वर्षीय कलरिपयत्तू (मार्शल आर्ट) लिजेंड शंकरनारायण मेनन चुंदयिल, माजी आंतरराष्ट्रीय मार्शल आर्ट चॅम्पियन फैसल अली दार, 67 वर्षीय माजी भारतीय फुटबॉल कर्णधार ब्रह्मानंद शंखवाळकर व 29 वर्षीय महिला हॉकीपटू वंदना कटारिया यांनाही पद्म पुरस्काराचा गौरव प्राप्त झाला. शंखवाळकर हे भारतात घडलेल्या सर्वोत्त्कृष्ट गोलरक्षकांपैकी एक आहेत. त्यांनी 1983 ते 1986 या कालावधीत भारतीय संघाचे नेतृत्व भूषवले.
महिला हॉकीपटू वंदना कटारियाने भारतातर्फे 200 पेक्षा अधिक सामने खेळले असून टोकियो ऑलिम्पिकमध्ये तिने हॅट्ट्रिक नोंदवली. भारतीय महिला हॉकी संघाने त्यात चौथे स्थान संपादन केले होते. पद्म पुरस्कार जेत्यांना दरवर्षी मार्च-एप्रिल महिन्यात राष्ट्रपती भवनात आयोजित शानदार सोहळय़ात राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मानित केले जाते.