ऑनलाईन टीम / पुणे :
विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते तथा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात यूट्युबवर आक्षेपार्ह बदमानी करणारा मजकूर टाकणाऱ्याविरोधात वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याचबरोबर पोलिसांनी आरोपीला अटकही केली आहे.
पुण्यातील थेरगावातल्या जगतापनगर इथे हा प्रकार घडला होता. महत्वाची बाब म्हणजे हा मुद्दा विधानसभेत उचलला गेला. त्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तात्काळ कारवाईचे आश्वासन दिले होते. त्यानुसार अजितदादांनी दिलेला शब्द पुणे पोलिसांनी खरा करुन दाखवला आहे.
देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत आक्षेपार्ह, बदनामी करणारा आणि अश्लील मजकूर असलेले वक्तव्य केलेला एक व्हिडीओ आरोपीने यूट्युबवर अपलोड केला होता. त्याबाबत आरोपीकडे कुठल्याही प्रकारचा पुरावा किंवा दाखले नव्हते. तरीही त्याने फडणवीसांची बदनामी करणाचा व्हिडीओ प्रसारित केला. याबाबत एका 37 वर्षीय महिलेने फिर्याद दिली होती. त्यानुसार पोलिसांनी तपास करुन आरोपी युवराज दाखलेला अटक केली आहे. हा आरोपी काळेवाडीतील तापकीरनगरचा रहिवासी आहे.
फडणवीसांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणारा व्हिडीओ पाहून फिर्यादी आणि पक्षाच्या अन्य कार्यकर्त्यांच्या मनात असंतोष निर्माण झाला. तसेच त्यांच्या भावना दुखावल्या गेल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. त्यानुसार भारतीय दंड विधान कलम 294 आणि 500 नुसार आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. वाडक पोलिसांनी या प्रकाराचा तपास करुन आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.