नवी दिल्ली \ ऑनलाईन टीम
गेल्या दोन दिवसांपासून दिल्लीत महाराष्ट्रातील भाजपचे प्रमुख नेते दाखल झाले आहेत. या नेत्यांच्या भेटीगाठींचे सत्र सुरु असतानाच आता सोमवारी माजी मुख्यमंत्री आणि राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे. या भेटीमध्ये नेमकी कोणती चर्चा झाली याची माहिती अद्याम समोर आलेली नाही.
तर दुसरीकडे रावसाहेब दानवे यांच्या दिल्लीतील निवासस्थानी भाजप नेत्यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत मराठा आरक्षण आणि इतर राजकीय विषयांवर चर्चा होण्याची शक्यता आहे.
चंद्रकांत पाटील हेही शनिवारपासून दिल्लीत आहेत. काल त्यांनी उद्योगमंत्री नारायण राणे यांची भेट घेतली. त्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी भाजपचा प्रदेशाध्यक्ष बदलण्याच्या चर्चेला उत्तर दिले होते. आमच्या पक्षात तशी चर्चा नाही. प्रदेशाध्यक्ष बदलण्याचा विचारही नाही. खरं तर भाजप काय आहे हे तुम्हाला कळलं नाही. सर्वसामान्य माणसांनाही भाजप समजली पाहिजे, असं सांगतानाच दर तीन वर्षाने आमच्या पक्षात फेरबदल होतो, असं पाटील म्हणाले होते.