नंदुरबार/प्रतिनिधी
राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल औरंगाबाद येथे केलेल्या वक्तव्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु असतानाच आज राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे एकाच गाडीतून प्रवास करताना दिसून आले. दरम्यान, नंदुरबार येथे ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी आणि सहकार महर्षी पी. के. अण्णा पाटील यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या लोकर्पण सोहळा होणार होता. यावेळी या सोहळ्याला देवेंद्र फडणवीस आणि मंत्री जयंत पाटील हे एकाच कार मधून कार्यक्रमाच्या ठिकाणी पोहोचल्याने चर्चांना उधाण आले. दरम्यान, महाराष्ट्राच्या राजकीय गोटात कालपासून विविध घडामोडी घडत असून संपूर्ण वातवरण ढवळून निघालं आहे.
दोन्ही नेत्यांना एकत्र पाहून आता विविध तर्क वितर्क लावण्यात येत आहेत. नंदुरबार येथे ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी आणि सहकार महर्षी पी के अण्णा पाटील यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या लोकर्पणाचा कार्यक्रम पार पडत आहे. या कार्यक्रमासाठी सर्वपक्षीय नेते उपस्थित आहेत. याच कार्यक्रमाच्या ठिकाणी पोहचण्यासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि जयंत पाटील हे एकाच कारमधून आले. भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांचा एकत्र कार प्रवास पाहून सर्वांच्या भुवया उंचावल्या.