प्रतिनिधी/ बेंगळूर
निजद वरिष्ठ नेते आणि माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा व त्यांच्या पत्नी चेन्नम्मा यांना कोरोनाची लागण झाली आहे. याबाबत देवेगौडा यांनी स्वतः ट्वीट केले आहे. काही दिवसांपासून आपल्या संपर्कात आलेल्यांनी कोविड चाचणी करून घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले आहे. तसेच पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आणि समर्थकांनी भीती बाळगण्याची आवश्यकता नाही, असे त्यांनी सांगितले आहे. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देवेगौडा यांना फोन करून त्यांच्या आरोग्याविषयी विचारपूस केली. तसेच ते लवकर बरे व्हावेत, अशी प्रार्थना केली. देशातील कोणत्याही ठिकाणी कोणत्याही इस्पितळात उपचाराची व्यवस्था करण्यात येईल, असेही पंतप्रधानांनी देवेगौडा यांना सांगितले. यावर देवेगौडा यांनी बेंगळूरमध्येच उपचार घेणार असल्याचे उत्तर दिले. त्याचप्रमाणे आरोग्यमंत्री डॉ. के. सुधाकर, विधानसभा विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या, उपमुख्यमंत्री डॉ. अश्वथ नाराण्या, लक्ष्मण सवदी यांच्यासह अनेकांनी देवेगौडा दाम्पत्य लवकर कोरोना मुक्त व्हावे, अशी प्रार्थना केली.