ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
लॉकडाऊन काळातही देशभरातील दुकाने काही अटींवर उघडण्यास केंद्राने परवानगी दिली आहे. गृहमंत्रालयाने शुक्रवारी रात्री उशिरा यासंदर्भात आदेश जारी केला आहे. त्यामुळे छोट्या व्यावसायिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
गृहमंत्रालयाने जारी केलेल्या आदेशानुसार देशातील सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये नोंदणीकृत असलेली सर्व दुकाने काही अटींवर सुरू ठेवता येणार आहेत. महानगरपालिका आणि नगरपरिषद हद्दीतील निवासी भाग व परिसरातील दुकाने या आदेशानुसार उघडता येणार आहेत. या दुकानात केवळ 50 टक्केच कर्मचारी काम करू शकणार आहेत. ते सोशल डिस्टन्सिंगचे पालन करतील. तसेच मास्क लावतील. या आदेशात शॉपिंग मॉल्स आणि शॉपिंग कॉम्प्लेक्स उघडण्यास मात्र परवानगी देण्यात आली नाही.
कोरोनामुळे हॉटस्पॉट आणि कंटेन्मेंट झोन घोषित करण्यात आलेल्या भागात दुकाने उघडण्यास परवानगी देण्यात आली नाही.