नवी दिल्ली / वृत्तसंस्था
कोरोना संकटातून कधी मुक्तता होणार याची वाट सगळेचजण पाहत आहेत. त्यातच जगभरातील अनेक देशात कोरोना प्रतिबंधक लसीवर संशोधन सुरू आहे. गेल्या आठ-नऊ महिन्यांपासून सुरू झालेला कोरोना विषाणू संसर्ग अद्यापही नियंत्रणात आलेला दिसत नाही. विविध देशांमधील संशोधक आणि वैद्यकीय कंपन्यांकडून संसर्ग रोखण्यासाठी प्रभावी लस आणण्याची तयारी केली जात आहे. मात्र, अद्यापही ही लस प्रत्यक्षात आलेली नाही. पुढील वर्षाच्या प्रारंभी म्हणजेच येत्या दोन-तीन महिन्यात भारतात नवी लस येणार असल्याचे संकेत दिले जात आहेत. मात्र, सदर लस संपूर्ण देशवासियांपर्यंत पोहोचण्यासाठी किमान एक वर्षाचा कालावधी लागणार असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून शनिवारी देण्यात आली.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे मुख्य सचिव राजेश भूषण यांनी पाठविलेल्या पत्रानुसार लसीकरणाचा कार्यक्रम संपूर्ण देशात राबविण्यासाठी एक वर्षापेक्षा अधिक कालावधी लागू शकेल. सर्वप्रथम ही लस आरोग्य सेवकांना दिली जाणार आहे. त्यानंतर सुरक्षा कर्मचारी, वयोवृद्ध आणि आजारी व्यक्ती अशा प्राधान्यक्रमाने लसीकरण केले जाणार आहे. आरोग्य मंत्रालयाने या मोहिमेसाठी देशातील सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी राज्य पातळीवर आणि जिल्हा पातळीवर समित्या नेमण्याच्या सूचना दिल्या आहेत. या समित्या लसीकरणाच्या तयारीवर लक्ष ठेवतील. यात लस साठवणीसाठी शीतगृहे, लस वाहतूक, दुर्गम भागात लस नेताना घ्यावयाची काळजी असे अनेक मुद्दे विचारात घेतले गेले आहेत. राज्याचे मुख्य सचिव, आरोग्य विभाग मुख्य सचिव आणि जिल्हा पातळीवर जिल्हाधिकाऱयांच्या नेतृत्वाखाली या समित्या नेमण्याचे निर्देश केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आले आहेत.
केंद्र सरकार कोविड 19 लसीकरणाच्या तयारीला लागले असून केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना त्या संदर्भात समन्वय समित्या स्थापन करण्यासंदर्भात सूचना देणारे पत्र पाठविले आहे. लसीकरणाचा कार्यक्रम राबविताना सार्वजनिक आरोग्य सेवेवर ताण येऊ न देण्याच्या सूचना दिल्या गेल्याचे समजते. तसेच सुरुवातीपासूनच सोशल मीडियावर नजर ठेवण्याचे आदेश राज्यांना दिले गेले आहेत. सोशल मीडियावरील अफवांमुळे लसीकरण कार्यक्रमावर प्रभाव पडण्याची शक्यता गृहीत धरून ही काळजी घेण्यात आली आहे.
‘जॉन्सन ऍण्ड जॉन्सन’ लस चाचणीच्या स्पर्धेत
कोरोनाविरोधी लसनिर्मितीच्या प्रक्रियेमध्ये ऑक्सफोर्ड कंपनीसोबतच जॉन्सन ऍण्ड जॉन्सन ही कंपनी देखील आघाडीवर आहे. जॉन्सन ऍण्ड जॉन्सन या कंपनीनेही कोरोना प्रतिबंधक लसीच्या चाचणीसंदर्भात एक मोठा निर्णय घेतला आहे. जॉन्सन ऍण्ड जॉन्सन कंपनीच्या अधिकाऱयाने अमेरिकन सेंटर फॉर डिसीज कंट्रोल ऍण्ड प्रिव्हेन्शनच्या बैठकीत एक महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे. लवकरच 12 ते 18 वर्ष वयोगटातील तरुणांवर कंपनी कोरोना प्रतिबंधक लसीची चाचणी करण्यासंदर्भात विचार करत आहे. युवक आणि लहान मुलांवर सुरक्षेचे सर्व निकष डोळय़ासमोर ठेवून कोरोनाच्या लसीची चाचणी करण्यासाठी नियोजन आखण्यात आले आहे.