नवी दिल्ली / वृत्तसंस्था
हिंदूंचा पवित्र धार्मिक सण महाशिवरात्र देशभरात उत्साहात साजरा करण्यात आला आहे. सर्व शिवमंदिरांमध्ये मंगळवारी सकाळपासूनच भाविकांच्या मोठय़ा रांगा लागल्या होत्या. शिवभक्त हिंदूंनी शिवरात्रनिमित्त, पूजाआर्चा, अभिषेक इत्यादी कार्यक्रमांचे आयोजन शिवमंदिरांमध्ये आणि घरांमधूनही केले होते.
काश्मीमधील रेआसी येथील प्रसिद्ध शिवमंदिरात भक्त गेल्या 10 वर्षांमध्ये प्रथमच मोठय़ा संख्येने उपस्थित होते. कोणताही अवांछनीय प्रसंग घडू नये, म्हणून सर्वत्र कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली होती. मध्यप्रदेशातील जगप्रसिद्ध महाकालेश्वर मंदिरात भक्तांनी शिवरात्र साजरी केली. देशाची राजधानी असणाऱया दिल्लीत सर्व शिवमंदिरांमध्ये सकाळपासूनच भक्तांचा सागर दर्शनासाठी जमला होता. वाराणसी येथे गंगा नदीच्या तटावरही शिवभक्तांचा महापूर लोटला होता.
शिवरात्र हिंदू पंचांगाप्रमाणे प्रत्येक महिन्यात येते. तथापि, महाशिवरात्र हा सण वर्षातून एकदाच, फेब्रुवारी किंवा मार्च महिन्यात येतो. हा सण साऱया देशभर, तसेच जगातही हिंदू समाजाकडून साजरा करण्यात येतो. शिव आणि शक्ती या आद्य तत्वांचा संगम यादिवशीच्या मध्यरात्री होतो अशी श्रद्धा आहे. हा दिवस भक्ती, आत्मिक ऊर्जा आणि हिंदूंची एकात्मता यासाठी साजरा केला जातो.
विदेशांमध्येही पूजाआर्चा
अमेरिका, ब्रिटन, ऑस्ट्रेलिया, जर्मनी, फ्रान्स इत्यादी देशांमधील हिंदू समाजाकडूनही हा सण साजरा करण्यात येतो. अनेक देशांमधील शिवमंदिरांमध्ये या दिवशी पूजाआर्चा आणि रुद्राभिषेकाच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. या दिवशी अनेक भक्त उपवास करतात, जो दुसऱया दिवशी सोडला जातो.