सेन्सेक्स 2713 अंकांनी तर निफ्टीत 757 अंकांची घसरण
वृत्तसंस्था / मुंबई
यावर्षी देशांतर्गत शेअर बाजारासाठी 16 मार्च हा दिवस ‘ब्लॅक मंडे’ ठरला आहे. यापूर्वी 9 मार्चला बाजारात ऐतिहासिक घसरण पाहायला मिळाली होती. तर गेल्या सोमवारी बाजाराच्या एका दिवसामध्ये सर्वात मोठी ऐतिहासिक इंट्राडे 2467 अंकांची घसरण झाली होती. सोमवारी पुन्हा एकदा सेन्सेक्स आणि निफ्टी मोठय़ा घसरणीसह बंद झाले. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 2713.41 अंकांनी तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 757.80 अंकांनी घसरला. व्यापाराच्या शेवटी सेन्सेक्स 31,390.07 अंकांच्या स्थरावर तर निफ्टी 9,197.40 अंकांच्या स्थरावर बंद झाला. शेअर बाजारात यावर्षीची ही 8 वी व दूसरी सर्वात मोठी घसरण नोंद झाली आहे.
मुंबई शेअर बाजारातील सर्व 30 कंपन्यांचे समभाग घसरणीच्या स्थरावर बंद झाले. तर राष्ट्रीय शेअर बाजारातील 49 कंपन्यांच्या समभागात विक्री तर एका कंपनीच्या समभागात खरेदी नोंदविण्यात आली. राष्ट्रीय शेअर बाजारातील येस बँकेच्या समभागात मजबुती पाहायला मिळाली. मुंबई शेअर बाजारातील इन्डसइन्ड बँकेचे समभाग सर्वाधिक 17.50 टक्के, टाटा स्टील 11.02 टक्के, एचडीएफसी 10.94 टक्के, ऍक्सिस बँक 10.38 टक्के तर आयसीआयसीआय बँकेच्या समभागात 9.96 टक्क्यांची मोठी घसरण नोंद झाली. राष्ट्रीय शेअर बाजारातील इन्डसइन्ड बँकेचे समभाग सर्वाधिक 18.35 टक्के, जेएसडब्लू स्टील 14.82 टक्के, वेदान्ता 10.89 टक्के, टाटा स्टील 10.70 टक्के तर आयसीआयसीआय बँकेच्या समभागात 10.31 टक्क्यांची घसरण पाहायला मिळाली.
गेल्या आठवडय़ात कोरोना विषाणू आणि कच्च्या तेल्यांच्या किंमतीमधील मोठी घसरण यामुळे सेन्सेक्स 3473 अंकांनी तर निफ्टी 1034 अंकांनी घसरला होता. तर शुक्रवारी शेअर बाजार निर्देशांकात 10 टक्क्यांच्या घसरणीनंतर 12 वर्षात पहिल्यांदा काही काळासाठी बंद करण्यात आला होता. मात्र, शेवटच्या क्षणी बाजाराने तेजी घेतली होती.
आशियाच्या इतर बाजारापैकी शंघाई 3.40 टक्के, हाँगकाँग 4.03 टक्के, सोल 3.19 टक्के तर टोक्यो 2.43 टक्क्यांनी घसरले.