वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारताने प्रथमच इतिहासात डिसेंबर महिन्यात 37.29 अब्ज डॉलर्सची निर्यात प्राप्त केली आहे. वर्षाच्या आधारे हा आकडा 37 टक्क्यांनी वधारला असल्याची माहिती आहे. डिसेंबर 2020 मध्ये भारताने 27.22 अब्ज डॉलर्सची निर्यात केली होती. यामध्ये मागील 9 महिन्यांच्या प्रवासात देशाने तब्बल 300 अब्ज डॉलर्सच्या निर्यातीचा टप्पा पार केला असल्याची माहिती आहे.
भारत 2021 ते 22 मध्ये निर्यात क्षेत्राची कामगिरी 400 अब्ज डॉलर्सच्या ध्येयापर्यंत पोहोचणार असल्याचे निश्चित केले असल्याचा विश्वास केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांनी व्यक्त केला आहे. भारत सध्या प्रत्येक क्षेत्रात सकारात्मक कामगिरी करत असल्याचे दिसून येत आहे. यामुळे प्रति क्षेत्र प्रमाणे निर्यातीमधील तेजी दिसून येत असल्याचेही मंत्री गोयल यांनी नमूद केले.
प्रमुख क्षेत्रांचा समावेश
सदरच्या कामगिरीत इंजिनिअरिंगच्या उत्पादनाची निर्यात 37 टक्के झाली, जेम्स ऍण्ड ज्वेलरीची निर्यात 16 टक्के, रेडिमेड कपडय़ांचा 22 टक्के तर इलेक्ट्रॉनिक्समध्ये 33 टक्के वाढ राहिली असल्याची माहिती आहे.
एप्रिल-डिसेंबर 2020 च्या तुलनेत
साधारणपणे एप्रिल ते डिसेंबर 2021 मध्ये भारताने 299.74 अब्ज डॉलर प्राप्त केली असून जी एप्रिल ते डिसेंबर 2020 च्या तुलनेत 201.37 अब्ज डॉलर्सपेक्षा 48.85 टक्के अधिक राहिली आहे.