ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
देशाचे माजी ॲटॉर्नी जनरल पद्मविभूषण सोली सोराबजी यांचे कोरोनाने निधन झाले. ते 91 वर्षांचे होते. कोरोनाची लागण झाल्यानंतर त्यांना दिल्लीतील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादररम्यान, आज सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली.
1930 साली मुंबईत सोराबजी यांचा जन्म झाला. 1953 मध्ये त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात वकीली सुरू केली. 1971 ते सर्वोच्च न्यायालयाचे वरिष्ठ वकील बनले. 1998 ते 2004 पर्यंत ते मानवाधिकार प्रोत्साहन व संरक्षण या विषयावर यूएन-सब कमिशनचे सदस्य आणि नंतर ते अध्यक्ष बनले. त्यांनी हेग येथेही 2000 ते 2006 पर्यंत लवादाचे सदस्य म्हणूनही काम पाहिले. एक तत्वनिष्ठ आणि मधुर व्यक्तीमत्व अशी ओळख असलेले सोराबजी 1989-90 आणि 1998-2004 या काळात दोन वेळा देशाचे ॲटॉर्नी जनरल हेते.
स्वातंत्र्य आणि मानवी हक्कांचे संरक्षण यामध्ये उल्लेखनीय काम केल्याने सोराबजी यांना मार्च 2002 मध्ये पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.