नवी दिल्ली / ऑनलाईन टीम
कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने प्रशासनाच्या चिंतेत वाढ झाली आहे. दुसऱ्या लाटेतच लहान मुलांना कोरोनाची लागण होत असल्याची अनेक प्रकरणं समोर येत आहेत. मुलांमधील वाढतं कोरोना संक्रमण पाहता काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ट्वीट करून सरकारला इशारा दिला आहे. मुलांच्या आरोग्याविषयी योग्य धोरण आखण्याचं तसेच देशाच्या भविष्यासाठी सरकारला झोपेतून जागं होणं गरजेचं आहे असं त्यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे.
राहुल गांधी यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे की, येणाऱ्या काळात मुलांना कोरोनापासून संरक्षित करणे गरजेचे आहे. अशा परिस्थितीत बालरोग सेवा आणि लस उपचार प्रोटोकॉल आधीच तयार करणे आवश्यक आहे. देशाच्या भविष्यासाठी मोदी सिस्टिमला झोपेतून उठवणे आवश्यक असल्याचे म्हटले आहे.
यापूर्वी देखील राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर सोशल मीडियाच्या माध्यमातून टीका केली आहे. ‘पीएमकेअरचे व्हेंटिलेटर आणि पंतप्रधान यांच्यात अनेक समानता आहेत. हे दोघेही जास्त खोटा प्रचार करतात. हे दोघेही आपले काम करण्यात अपयशी ठरतात. दोघांनाही सापडणे कठीण आहे, असे राहुल गांधी म्हणाले होते.