मुलांकडून चेकपोस्टची निर्मिती
रशिया-युक्रेन युद्धाला 42 दिवस पूर्ण झाले आहेत. दोन्ही देशांदम्यान वारंवार चर्चा होऊनही तोडगा निघताना दिसत नाही. रशियाच्या हल्ल्यांमध्ये युक्रेनच्या शहरांमध्ये मोठा विध्वंस घडला आहे. आतापर्यंत 1 कोटी 10 लाखाहून अधिक युक्रेनियन नागरिक बेघर झाले आहेत. रशिया लवकरच कीव्हवर कब्जा करेल असा दावा युद्धाच्या प्रारंभी करण्यात आला होता, परंतु युक्रेनचे सैन्य आणि नागरिकांसमोर रशियाच्या सैन्याचा निर्धार डगमगला आहे. रशियाला युक्रेनच्या बहुतांश भागांमधून आता माघार घ्यावी लागत आहे. युक्रेनच्या सैन्यासोबत देशातील तरुण-तरुणी अन् महिला देखील रशियाच्या सैन्याला भिडत आहेत. शत्रू देशाला रोखण्यासाठी संकटग्रस्त युक्रेनमध्ये मुलांनाही आवश्यक प्रशिक्षण देण्यात येत आहे. ओडेसा शहराच्या बाहेरील भागात छोटय़ा मुलांनी स्वतःची एक चेकपोस्ट तयार केली असून अत्यंत प्रोफेशनल पद्धतीने सैन्य प्रोटोकॉलचे पालन करत ही लहान मुले स्थिती हाताळत आहेत. या कामात येथील सिव्हिल डिफेन्स डिपार्टमेंट आणि सर्वसामान्य नागरिकही त्यांना साथ देत आहेत.
रशियाच्या सातत्याने होणाऱया हल्ल्यानंतरही युक्रेन न झुकण्यामागे या देशातील नागरिकांचा निर्धार हे महत्त्वाचे कारण आहे. 2014 मध्ये क्रीमियावर रशियाने कब्जा केल्यावर युक्रेनने स्वतःच्या शत्रू देशाला सामोरे जाण्याची तयारी सुरू केली होती. रशिया पुन्हा हल्ला करू शकतो असा संशय युक्रेनला पूर्वीपासूनच होता. याचमुळे युक्रेनच्या सैन्याने स्वतःची तयारी शक्तिशाली रशियाला डोळय़ासमोर ठेवूनच सुरू केली होती. युक्रेनच्या सैन्यसामग्रीच्या शक्तीत वाढ करण्यामागे पाश्चिमात्य देशांचा हात आहे. नाटो आणि युरोपीय महासंघाचे सदस्य देश या युद्धात युक्रेनला उघडपणे मदत करत आहेत. सैन्य आणि आर्थिक मदत युक्रेनला पुरविली जात आहे. युक्रेनला दिल्या जाणाऱया 10 कोटी डॉलर्सच्या अतिरिक्त सुरक्षा सहाय्यात जेवलिन रणगाडाविरोधी यंत्रणा सामील करण्यात येणार असल्याचे अमेरिकेने बुधवारीच जाहीर केले आहे. अमेरिकेच्या संरक्षण विभागाने एक एप्रिल रोजी युक्रेनला 30 कोटी डॉलर्सच्या सैन्य मदतीची घोषणा केली होती.