ऑनलाईन टिम / मोहाली
४० लाख रुपये खर्चून भारतातील पहिला इंटेलिजंट रोड म्हणजे ‘बुद्धिमान रस्ता’ पंजाबमध्ये तयार होत आहे.आयआयटी रुरकी हा विशेष सेन्सरयुक्त रोड तयार करणार असून मोहाली विमानतळाकडे जाणाऱा १० किमी लांबीचा हा रस्ता होत आहे. हा प्रकल्प पंजाब रस्ते सुरक्षा अथवा ट्रॅफिक रिसर्च सेंटर मोहालीच्या देखरेखीखाली होणार असून यासाठी पंजाब पोलिस, आयआयटी रुरकी आणि पंजाबमधील सेफ सोसायटीत एक सामंजस्य करार झाला आहे.
आयआयटी रुरकीने या रस्त्यासाठी लागणाऱ्या प्रत्येक तांत्रिक गोष्टीचा अभ्यास केला असून पंजाबच्या वाहतूक सल्लागार कार्यालयाने या प्रकल्पाला डेव्हलपमेंट ऑफ इंटेलिजंट मोबिलिटी अँड इफिशियंट ट्रॅफिक कंट्रोल सिस्टिम असे नाव दिले आहे. या रस्त्याचा मुख्य उद्देश अपघात टाळणे असून त्याच बरोबर पेट्रोल बचतही होईल. या रस्त्यावरून धावणाऱ्या रुग्णवाहिकेला ओळखून तिच्यासाठी असलेला स्पेशल सेन्सर तिला वेगळी जागा उपलब्ध करून देईल. याच बरोबर एखादे वाहन वळण घेत असेल किंवा मागे येत असेल तर सेन्सर आवाज करून अन्य वाहनांना सतर्क करेल. तसेच रस्त्यावर काही घडत असेल तर त्यासमोर येणाऱ्या वाहनांना लांबूनच सूचना मिळतील.
पंजाबचे वाहतूक सल्लागार नवदीप असिजा यांच्या म्हणण्यानुसार, विमानतळ रस्त्यावर सर्वाधिक अपघात होतात त्यामुळे या रस्यावर ५ अॅक्सिडेंटल स्पॉट आहेत. इंटेलिजंट रोडवर ट्रॅफिक लाइट्स वाहतुकीच्या हिशेबाने चालतील यामध्ये सिटी बस सेवा व रुग्णवाहिकेस प्राधान्य मिळेल. गर्दीत रुग्णवाहिका अडकल्यास याबाबतची माहिती सेन्सरद्वारे मिळेल आणि १० किमीपर्यंत रुग्णवाहिकेस वाहतूक सिग्नल हिरवा दाखवेल. तसेच अशाचप्रकारे अग्निशमन वाहन आणि पोलिस गाड्यांसाठी सुविधा उपलब्ध करुन मिळेल.