वृत्तसंस्था / नवी दिल्ली
सध्या जगातील सर्वत्र थैमान घालणाऱया कोरोना विषाणूने भारतात पाय पसरण्यास सुरुवात केली आहे. यामुळे याचा परिणाम देशातील लहान मोठय़ा उद्योगधंद्यावर होणार असल्याचे संकेत निर्माण झाले आहे. यामुळे नागरिकांचा ओढा ऑनलाईन शॉपिंगकडे वळल्याचे दिसून येत आहे. आगामी काही दिवसांमध्ये याचा प्रभाव मॉल, सुपर मार्केट आणि रिटेल शॉप आदी ठिकाणी जात खरेदी करण्यात घट होत ऑनलाईनमध्ये वाढ होणार असल्याचे रिटेलर्स असोसिएशन ऑफ इंडिया(आरएआय) यांनी सांगितले आहे.
देशामधील मॉर्डन रिटेल क्षेत्रातील जवळपास 60 लाख कर्मचारी काम करत आहेत. यात जवळपास 40 टक्के म्हणजे 24 लाख लोकांचा रोजगार आगामी चार महिन्यात जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. 31 मार्चपर्यंत देशातील जास्तित जास्त मॉल, सुपर मार्केट आणि अन्य मॉडर्न रिटेल शॉप बंद ठेवण्यात आले आहेत.
रिटेल कमाईत मोठी घसरण
आरएआयचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार राजगोपालन यांनी सांगितल्याप्रमाणे आगामी 6 महिन्यात रिटेल क्षेत्रातील कमाईमध्ये 90 टक्क्यांनी घट होण्याचे संकेत दिले आहेत. यासोबतच आरएआयने सरकारकडे रिटेल क्षेत्रासाठी विशेष अर्थ सहाय्य मिळावे यासाठीची मागणी केली आहे. सोबत रिटेल क्षेत्रासाठी कर्जातही सवलत व जीएसटीसह अन्य करात सवलत मिळण्याचा प्रस्ताव देण्यात आला आहे. आरएआय भारतात जवळपास 5 लाख स्टोअरचे प्रतिनिधीत्व करत आहे. यामध्ये व्ही-मार्ट, शॉपर्स स्टॉप, फ्यूचर ग्रुप आणि एवेन्यू सुपरमार्ट्सचा समावेश आहे. ज्याला ग्रॉसरी चेन डी-मार्ट ऑपरेट करत आहे. परंतु नवीन मार्ग शोधण्याची गरज रिटेल क्षेत्राला असल्याचेही म्हटले आहे.
116 रिटेल स्टोअर बंद
हायपरमार्केट बिग बाजाराचे ओनर फ्यूचर रिटेल ओनर्स यांनी कोरोनामुळे महसूलातही घसरण होणार असल्याचे अनुमान मांडले आहे. भारतामध्ये सध्या कोरोनाचा वाढता प्रभाव त्यामुळे देशभरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या परिस्थितीत 5 ते 21 मार्च या कालावधीत जवळपास रिटेल क्षेत्रातील महसूलात 30 टक्क्यांनी घसरण झाली आहे. तर संपूर्ण देशात शनिवारपर्यंत 265 पैकी 116 रिटेल स्टोअर बदं झाल्याची माहिती आहे.