गेल्या 24 तासात 1,258 मृत्यू-57 हजार 944 डिस्चार्ज
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
दोन दिवस रुग्णसंख्या 50 हजारांच्या आत आल्यानंतर रविवारी पुन्हा एकदा रुग्णसंख्या वाढून 50 हजारांच्या वर गेली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार, देशात गेल्या 24 तासात 50 हजार 040 रुग्णांची भर पडली असून 1,258 लोकांचा मृत्यू झाला आहे. शनिवारी देशात 48 हजार 698 रुग्णांची भर पडली होती तर 1,183 लोकांचा मृत्यू झाला होता. दरम्यान, शनिवारी दिवसभरात 64 लाख 25 हजार लोकांना कोरोनाची लस देण्यात आली असून आतापर्यंत एकूण 32 कोटी 17 लाखाहून जास्त कोरोनाच्या लसीचे डोस देण्यात आले आहेत.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, शनिवारी दिवसभरात 57 हजार 944 रुग्ण उपचाराअंती बरे झाले आहेत. देशातील रुग्णांच्या रिकव्हरी दरात वाढ झाली असून तो 96.75 टक्क्मयांवर पोहोचला आहे. देशात अजूनही 5 लाख 86 हजार 403 सक्रिय रुग्ण आहेत. गेल्या 24 तासात सक्रिय रुग्णसंख्येत 9,162 रुग्णांची निव्वळ घट झाली असून देशात नोंद झालेल्या एकूण कोरोना रुग्णसंख्येच्या तुलनेत हे प्रमाण आता केवळ 1.94 टक्के आहे.
देशात 32 कोटींहून अधिक जणांचे लसीकरण
देशव्यापी कोव्हिड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेंतर्गत, लसीचे एकूण 32 कोटीहून अधिक डोस देण्यात आले आहेत. संपूर्ण देशभरात चाचणी क्षमतेत मोठय़ा प्रमाणात वाढ झाली असून गेल्या 24 तासांत देशात एकूण 17 लाख 77 हजार 309 चाचण्या करण्यात आल्या. भारतात आतापर्यंत एकूण 40 कोटी 42 लाख 65 हजार 101 चाचण्या करण्यात आल्या आहेत. देशभरात एकीकडे चाचण्या वाढविण्यात आल्या आहेत, तर दुसरीकडे साप्ताहिक रुग्णसंख्येत सतत घट दिसून येत आहे.