दिवसभरात तब्बल 29 हजार 429 ने भर : मृतांमध्ये 582 ने वाढ
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
देशात एका दिवसात सापडलेल्या कोरोना बाधितांच्या आकडय़ाने बुधवारी नवा उच्चांक नोंदवला. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने बुधवारी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार गेल्या चोवीस तासात तब्बल 29 हजार 429 नव्या रुग्णांची नोंद झाल्यामुळे एकूण रुग्णसंख्या 9 लाख 36 हजार 181 इतकी झाली आहे. आतापर्यंतची एका दिवसातील ही सर्वाधिक रुग्णसंख्या आहे. चाचण्यांमध्ये वेग आल्यामुळे अधिक रुग्ण सापडत असल्याचा कयास बांधला जात आहे. दरम्यान चोवीस तासातील मृतांचा आकडाही 582 ने वाढल्यामुळे आतापर्यंत देशात 24 हजार 309 जणांचा कोरोनाने बळी गेल्याचे आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.
नुकताच भारत सर्वाधिक रुग्णसंख्या असलेल्या देशांच्या जागतिक यादीत तिसऱया स्थानावर पोहोचला आहे. भारतात सध्या 5 लाख 92 हजार 32 जण कोरोनामुक्त झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस सुधारत असून शुक्रवारी जवळपास 20 हजार 572 जणांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. मात्र तपासण्यांचा वेग वाढविण्यात आल्याने नवीन रुग्णही वाढत आहेत. सध्याच्या गतीने बाधित रुग्णांमध्ये वाढ होत गेल्यास येत्या दोन दिवसातच एकूण रुग्णसंख्या 19 लाखांवर पोहोचणार आहे. भारतात सलग सहाव्या दिवशी (24 तासात) 26 हजारापेक्षा जास्त कोरोनाबाधित रुग्ण आणि चारशेपेक्षा अधिक कोरोनाबळी गेले आहेत. बुधवारी दिवसभरात देशात 582 बळींची नोंद झाली आहे.