दिवसभरात तब्बल 26 हजार 506 ने भर : मृतांमध्ये 475 ने वाढ
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
देशात एका दिवसात सापडलेल्या कोरोना बाधितांच्या आकडय़ाने शुक्रवारी नवा उच्चांक नोंदवला. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने शुक्रवारी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार गेल्या चोवीस तासात तब्बल 26 हजार 506 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. आतापर्यंतची एका दिवसातील ही सर्वाधिक रुग्णसंख्या आहे. चाचण्यांमध्ये वेग आल्यामुळे अधिक रुग्ण सापडत असल्याचा कयास बांधला जात आहे. दरम्यान, रविवारी 1.8 लाख, सोमवारी 2.41 लाख, तर मंगळवारी 2.62 लाख जणांच्या कोरोना चाचण्या झाल्याचेही आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.
नुकताच भारत सर्वाधिक रुग्णसंख्या असलेल्या देशांच्या जागतिक यादीत तिसऱया स्थानावर पोहोचला आहे. सध्या दुसऱया क्रमांकावर असलेल्या ब्राझीलमध्ये 17 लाख 59 हजार 103, तर सर्वोच्च स्थानी असलेल्या अमेरिकेत तब्बल 32 लाख 19 हजार 999 रुग्ण आहेत. भारतात सध्या 2 लाख 76 हजार 685 सक्रीय कोरोनाबाधित रुग्ण आहेत. तर 4 लाख 95 हजार 513 जण कोरोनामुक्त झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस सुधारत असून शुक्रवारी जवळपास 20 हजार जणांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला.
चार दिवसात रुग्ण्संख्या लाखाने वाढणार
शुक्रवारपर्यंत देशात 26 हजार 506 नवे कोरोनाबाधित सापडल्याने एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा 7 लाख 93 हजार 802 वर गेला आहे. 7 जुलैला भारताने सात लाख रुग्णांचा आकडा पार केला होता. मात्र याच वेगाने नवीन रुग्ण आढळत राहिल्यास देशात पुढील 24 तासात आठ लाख रुग्णसंख्येचा टप्पा ओलांडला जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. म्हणजेच अवघ्या चार दिवसात एक लाखाने रुग्णसंख्या वाढेल. गेल्या 24 तासात देशात 475 कोरोनाग्रस्त रुग्णांना प्राण गमवावे लागले. आतापर्यंत 21 हजार 604 कोरोना रुग्णांना प्राण गमवावे लागले आहेत.
दिवसभरात 475 बळींची नोंद
भारतात सलग सहाव्या दिवशी (24 तासात) 21 हजारापेक्षा जास्त कोरोनाबाधित रुग्ण आणि चारशेपेक्षा अधिक कोरोनाबळी गेले आहेत. शुक्रवारी दिवसभरात देशात 475 बळींची नोंद झाली आहे. गेल्या आठवडय़ाभरात पाचव्यांदा एका दिवसात सर्वाधिक सापडण्याचा विक्रम नोंदवला गेला. मात्र, मृत्युमुखी पडणाऱयांचा आकडा जवळपास एकाच पातळीवर असल्याचे दिसून येत आहे.