24 तासात कोरोनाचे 7 हजारांहून अधिक नवे रुग्ण
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
देशात सध्या 11 राज्यांमध्ये ओमिक्रॉन व्हेरियंटचे रुग्ण सापडल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून शुक्रवारी देण्यात आली. गुजरात, कर्नाटक आणि दिल्लीमध्ये ओमिक्रॉनच्या रुग्णांची नोंद झाल्यानंतर देशात एकूण ओमिक्रॉनबाधितांची संख्या 101 वर पोहोचली आहे. सध्या ओमायक्रॉनचे सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आहेत. महाराष्ट्रात सध्या ओमिक्रॉनचे सर्वाधिक 32 रुग्ण आहेत, तर दिल्लीत 22, राजस्थानमध्ये 17, कर्नाटकात 8, तेलंगणात 8, केरळात 5, गुजरातमध्ये 5 तर पश्चिम बंगाल, आंध्रप्रदेश, तामिळनाडू आणि चंदिगढमध्ये प्रत्येकी एक रुग्ण आढळून आले आहेत.
देशात गेल्या 24 तासांत कोरोना व्हायरसच्या 7 हजार 447 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. देशात सध्या सक्रिय रुग्णांची संख्या 86 हजार 415 आहे. या महामारीमध्ये मृतांची संख्या वाढून 4 लाख 76 हजार 869 वर पोहोचली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या वतीने जारी करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, गुरुवारी 7,886 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यानंतर आतापर्यंत 3 कोटी 41 लाख 62 हजार 765 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आतापर्यंत देशात 3 कोटी 47 लाख 26 हजार 49 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे.
देशव्यापी लसीकरण मोहिमेंतर्गत आतापर्यंत लसीचे जवळपास 136 कोटी डोस देण्यात आले आहेत. गुरुवारी देशात 70 लाख 46 हजार 805 डोस देण्यात आले आहेत. ज्यानंतर आतापर्यंत लसीच्या 135 कोटी 99 लाख 96 हजार 267 डोस देण्यात आले आहेत.
ब्रिटनमध्ये उच्चांकी कोरोनाबाधितांची नोंद
ब्रिटनमध्ये कोरोनाबाधितांची संख्या पुन्हा एकदा वाढू लागली आहे. सलग दुसऱया दिवशी ब्रिटनमध्ये कोरोनाबाधितांची उच्चांकी नोंद करण्यात आली. गुरुवारी ब्रिटनमध्ये 88 हजार 376 कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली. ब्रिटनमध्ये कोरोनाबाधितांची संख्या वाढू लागल्याने सरकार आणि प्रशासनाची चिंता वाढली आहे. ब्रिटनमध्ये ओमिक्रॉनबाधितांची संख्या वाढत असल्याचे समोर आले आहे. मागील 28 दिवसांमध्ये ब्रिटनमध्ये कोरोनाबाधित असलेल्या 165 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोना विषाणूची सुरुवात झाल्यानंतर ब्रिटनमध्ये दुसऱयांदा बाधितांची उच्चांकी नोंद करण्यात आली. ब्रिटनमध्ये बुधवारी 78 हजार 610 बाधितांची नोंद करण्यात आली होती.