केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची माहिती : उत्तर प्रदेश अव्वल स्थानी : निर्मितीकरीता प्रोत्साहन
नवी दिल्ली : देशामध्ये सर्वाधिक इलेक्ट्रिक वाहनांची खरेदी मागील काही दिवसांमध्ये वाढत असल्याचे पहावयास मिळाले आहे. यामध्ये विविध राज्यांच्या तुलनेत उत्तरप्रदेश अव्वल स्थानी राहिले आहे. तसेच दिल्ली आणि कर्नाटक दुसऱया आणि तिसऱया स्थानी राहिले असल्याची माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी राज्यसभेमध्ये दिली आहे.
देशामध्ये सध्याच्या कालावधीत 870,141 इलेक्ट्रिक वाहनांची नोंदणी करण्यात आली आहे. यामध्ये सर्वाधिक 2,55,700 इतक्या इलेक्ट्रिक वाहनांची नोंदणी ही उत्तर प्रदेश राज्यात झाली आहे. या पाठोपाठ दिल्ली आणि कर्नाटक अनुक्रमे दुसऱया आणि तिसऱया क्रमांकावर राहिले आहेत. दिल्लीत 125,347 तर कर्नाटकात 72,544 वाहनांची नोंदणी करण्यात आली आहे. या पाठोपाठ बिहार 58,014 तर महाराष्ट्रात 52,506 वाहनांची नेंदणी झाली आहे.
फेम इंडिया योजनेचा दुसरा टप्पा
अवजड उद्योग मंत्रालयाने फास्टर अडॉप्शन अँड मॅन्युफॅक्चरिंग ऑफ (हायब्रिड) इलेक्ट्रिक व्हेईकल्स इन इंडिया अर्थात फेम योजना 2015 मध्ये भारतात आणली असून ती हायब्रिड व इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढण्यासाठी प्रोत्साहन देणारी आहे. सध्याला फेम इंडिया मोहिमेंतर्गत दुसऱया टप्प्यातील योजनेकरीता (5 वर्षाकरीता) 10 हजार कोटी रुपयांचे सहाय्य देण्यात आले असल्याचे मंत्री गडकरी यांनी म्हटले आहे. जेणेकरून वाहन निर्मितीला प्रोत्साहन मिळेल.
जीएसटी केला कमी
दुसरीकडे जीएसटी कर हा अशा प्रकारच्या इलेक्ट्रिक वाहनांवर कमी करण्यात आला आहे. या गाडय़ांच्या निर्मितीला पाठबळ देण्यासाठीच सरकारने हा निर्णय घेतला आहे. 12 टक्के इतका यापूर्वी जीएसटी आकारला जात होता, तो आता 5 टक्के इतका केला आहे, असेही त्यांनी सांगितले. याचप्रमाणे इलेक्ट्रिक वाहनांकरीताच्या चार्जिंग केंद्रांवरही जीएसटी कर 18 वरून 5 टक्के इतका कमी करण्यात आला आहे. जेणेकरून या क्षेत्राला येत्या काळात आपली प्रगती अधिक सुकर करता येऊ शकेल.