दिवसभरात 12 हजार 881 नव्या बाधितांची नोंद
नवी दिल्ली/ वृत्तसंस्था
गेल्या 24 तासांत देशभरात 12 हजार 881 नवे बाधित सापडल्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. त्यातच दुसरी लाट अधिक तीव्र आणि अधिक वेगाने पसरू शकते, असा अंदाज वैद्यकीय तज्ञ व्यक्त करत असल्यामुळे कोरोना प्रतिबंधक नियमांची कडक अंमलबजावणी करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.
गुरुवारी सकाळी 8 वाजेपर्यंतच्या मागील 24 तासांमधील आकडेवारी पाहता राजधानी दिल्लीसह एकूण 16 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये कोरोनामुळे एकही मृत्यू झालेला नाही. देशात गुरुवारी कोरोनामुळे 101 मृत्यूंची नोंद झाली आहे. देशभरात आत्तापर्यंत कोरोनामुळे 1 लाख 56 हजार 14 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मात्र, महाराष्ट्रासह काही राज्यांमध्ये नव्या बाधितांचा आकडा वाढलेला दिसून येत आहे. गुरुवारी 12 हजार 881 नवे बाधित सापडले असून आतापर्यंतच्या रुग्णांचा एकंदर आकडा 1 कोटी 9 लाख 50 हजार 201 झाला आहे. तर दिवसभरात 11 हजार 987 जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून अजूनही देशात 1 लाख 37 हजार 342 सक्रिय रुग्ण असल्याचे आकडेवारीतून स्पष्ट होत आहे.
आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी
दक्षिण आफ्रिका आणि ब्राझिलियन स्ट्रेन-कोविडचे दोन नवीन आणि अत्यंत संसर्गजन्य स्ट्रेन भारतात आढळल्यामुळे आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात आली आहेत. नवीन नियम हे ब्रिटन, युरोप आणि मध्य पूर्वमधील प्रवासी वगळता इतर भागातून येणाऱया आंतरराष्ट्रीय प्रवाशांना लागू असतील, असे आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे. नवीन नियमांतर्गत, प्रस्थान करण्याच्या 72 तास अगोदर आरटी-पीसीआर चाचण्या निगेटिव्ह असणाऱया प्रवाशांनाच विमानात चढण्याची परवानगी देण्यात येणार आहे. तसेच ब्रिटन, युरोप आणि मध्य-पूर्वेमधून प्रवास करणाऱया प्रवाशांना देशात आल्यावर स्वतःच्या खर्चाने आरटी-पीसीआर चाचणी करणे अनिवार्य आहे.