24 तासात 86 हजार 508 नवे रुग्ण : 1,129 जणांचा मृत्यू
नवी दिल्ली : देशात सर्वाधिक कोरोनाबाधित सापडणाऱया पाच राज्यांत सक्रिय बाधितांच्या संख्येत घट होताना गेल्या काही दिवसांपासून दिसत आहे. यात सर्वाधिक घट आंध्रप्रदेशात पाहायला मिळत असून तेथे गेल्या दोन आठवडय़ात सक्रिय बाधितांच्या संख्येत 30 टक्के घट झाली. दरम्यान, सध्या देशात दररोज 80 ते 90 हजारांच्या दरम्यान रुग्ण आढळून येत आहेत. गेल्या काही आठवडय़ापासून अचानक झालेल्या रुग्णवाढीने देशातील एकूण रुग्णांची संख्याही 57 लाखांच्या पुढे गेली आहे. दुसरीकडे गेल्या 24 तासात देशात 1,129 जणांचा संसर्ग होऊन मृत्यू झाला.
आंध्रप्रदेशात 10 सप्टेंबरपर्यंत दररोज सुमारे 10 हजार बाधित सापडत असत. मात्र, सध्या ही संख्या 8 हजारपर्यंत खाली आली असून कोरोनामुक्तांची संख्या 10 हजारपेक्षा अधिक होत आहे. वाढीचा वेग महिन्याच्या सुरुवातीच्या तुलनेत निम्म्यावर आला आहे.
आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या 24 तासांत देशात 86 हजार 508 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे देशातील बाधितांची संख्या 57 लाख 32 हजार 518 इतकी झाली असून, 24 तासांत 1,129 जण मृत्युमुखी पडल्यामुळे मृतांची एकूण संख्या 91 हजार 149 झाली आहे.
आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, देशात 9 लाख 66 हजार 382 जणांवर उपचार सुरु आहेत. तर कोरोना संसर्गातून बरे झालेल्यांची संख्या 46 लाख 74 हजार 987 इतकी झाली आहे. दरम्यान, आयसीएमआरने दिलेल्या माहितीनुसार देशात आतापर्यंत 6 कोटी 74 लाख 36 हजार 31 कोरोना चाचण्या घेण्यात आल्या आहेत. तर बुधवारी 11 लाख 56 हजार 569 चाचण्या घेण्यात आल्या आहेत.