सात राज्यांमध्ये 87.73 टक्के रुग्ण- महाराष्ट्रात स्थिती चिंताजनक
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
देशभरात कोरोना कहर वाढत असून गेल्या काही दिवसांत दररोज नवीन रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने रविवारी सकाळी जारी केलेल्या आकडेवारीनुसार, मागील चोवीस तासात 25 हजार 320 नवीन रुग्ण देशभरात आढळून आले. त्यात एकटय़ा महाराष्ट्रातील 15 हजार 802 नवीन रुग्णांचा समावेश आहे. कर्नाटकातही सध्या रुग्ण वाढत असून दिवसभरात हजारच्या आसपास नवे बाधित सापडत आहेत.
आरोग्य मंत्रालयाच्या अहवालानुसार, देशात सात राज्यांमध्ये 87.73 टक्के इतके रुग्ण असून तेथील परिस्थिती चिंताजनक आहे. या सात राज्यांमध्ये महाराष्ट्रासह केरळ, पंजाब, कर्नाटक, गुजरात, तामिळनाडू आणि मध्यप्रदेश यांचा समावेश आहे. महाराष्ट्राच्या मानाने अन्य राज्यांची परिस्थिती बरी आहे. इतर राज्यांमध्ये दररोज सापडणाऱया नवीन रुग्णांची संख्या एक हजाराच्या आत आहे. हे पाहता महाराष्ट्राची स्थिती अतिशय बिकट दिसत आहे.
देशात रविवारी दिवसभरात 25 हजार 320 नवे बाधित सापडले. नव्या वर्षातील एका दिवसात सापडलेले हे सर्वाधिक नवीन रुग्ण आहेत. देशातील एकूण कोरोना रुग्णांची स्थिती 1 कोटी 13 लाख 59 हजार 48 इतकी झाली आहे. त्यापैकी 1 कोटी 9 लाख 89 हजार 897 रुग्ण बरे झाले आहेत. असे असले तरी देशभरातील सक्रीय रुग्णांची संख्या 2 लाखांच्या पुढे गेली आहे. सध्या देशात 2 लाख 10 हजार 544 रुग्णांवर वेगवेगळय़ा इस्पितळांमध्ये उपचार सुरू आहेत. शनिवारी एका दिवसात 16 हजार 637 जणांना डिस्चार्ज देण्यात आला.
काही भागात कमी संसर्ग
देशातील 14 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मागील 24 तासांमध्ये कोरोनामुळे एकही मृत्यू झाला नाही. यामध्ये राजस्थान, झारखंड, पुदुच्चेरी, लक्षद्वीप, मेघालय, दमण आणि दिव, दादरा नगर हवेली, नागालँड, त्रिपुरा, सिक्कीम, लडाख, मणिपूर, मिझोराम, अंदमान निकोबार द्विप समूह यांचा समावेश आहे.
लसीकरण लाभार्थी 3 कोटींवर
देशभरात लसीकरणाची मोहीम जोरात सुरू आहे. लसीकरण रविवारी 3 कोटी पार करण्याची शक्मयता आहे. शनिवारपर्यंत देशभरातील 2 कोटी 97 लाख 38 हजार 409 नागरिकांचे लसीकरण झाले आहे. आतापर्यंत देशात वैद्यकीय कर्मचारी, फ्रन्टलाईन वर्कर्स यांच्यासह ज्येष्ठ नागरिकांना लसीकरण केले जात आहे. आता पुढील टप्प्यात 50 वर्षांवरील सर्व नागरिकांना लसीकरण केले जाणार असल्याचे समजते.