ऍमेझॉन, फ्लिपकार्ट आणि बिग बास्केटला देणार टक्कर
वृत्तसंस्था/ मुंबई
रिलायन्स इंडस्ट्रीजने नवीन ऑनलाईन किराणा वस्तुंची विक्री सेवा जिओमार्टच्या आधारे देशातील 200 पेक्षा अधिक शहरांमध्ये उपलब्ध करुन दिली असल्याची माहिती कंपनीने दिली आहे. जिओमार्टने या प्लॅटफॉर्मची मोठी टक्कर येत्या काळात ऍमेझॉन, फ्लिपकार्ट आणि बिग बास्केटसोबत राहणार असल्याचे म्हटले आहे.
संकटाच्या काळात सेवा देणे आवश्यक असून हेच हेरून कंपनीने किराणा वस्तुंच्या विक्रीवर जास्तीत जास्त लक्ष केंद्रीत करण्याचे निश्चित केले आहे. चांगल्यात चांगली सेवा देण्यासाठी जिओ सज्ज असेल असे मत जिओच्या ग्रॉसरी विभागाचे प्रमुख दामोदर मल यांनी व्यक्त केले आहे. म्हणजेच कोणत्याही संकटात नुकसान तर ठरलेले असते पण यातूनही वाट काढत सेवा देणे हे महत्त्वाचे असते, असेही त्यांनी सांगितले.
ऑर्डर देण्यासाठी
जिओमार्टवर कोणत्याही ग्राहकाला ऑर्डर द्यावयाची असल्यास jiomart.com वर लॉगिन करावे लागणार आहे. सेवेचा लाभ घ्यायचा असल्यास ग्राहकांना ऍपल किंवा गुगल प्ले स्टोअरला भेट द्यावी लागणार असल्याचे जिओने म्हटले आहे. या वेबसाईटवर दूध, दूग्धोत्पादने, वैयक्तिक काळजीची साधने आणि लहान मुलांची उत्पादने उपलब्ध होणार आहेत.