नवी दिल्ली / वृत्तसंस्था
देशभरातील कोरोनाबाधितांच्या संख्येत घट होण्याचे सत्र सुरूच आहे. मागील दोन दिवसांच्या तुलनेत शनिवारी कोरोनाबाधितांची संख्या आणखी कमी झाली आहे. शुक्रवारी दिवसभरात देशभरात 1 लाख 27 हजार 952 बाधितांची नोंद करण्यात आली. त्यापूर्वी गुरुवारी 24 तासांमध्ये 1 लाख 49 कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली होती. दरम्यान, देशव्यापी लसीकरण मोहिमेंतर्गत आतापर्यंत 169 कोटी डोस देण्यात आले आहेत. शुक्रवारी एका दिवसात 47 लाख 53 हजार 81 डोस देण्यात आले.
देशात संसर्गाचा पॉझिटिव्हिटी दर हा 7.98 टक्के इतका झाला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने शनिवारी सकाळी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, देशात सध्या सक्रिय कोरोनाबाधितांची संख्या 13 लाख 31 हजार 648 इतकी झाली आहे. तर, कोरोनामुळे 5 लाख 1 हजार 114 जणांचा मृत्यू झाला आहे. शुक्रवारी दिवसभरात 1,059 बाधितांचा मृत्यू झाला असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली. मागील 24 तासांमध्ये 2 लाख 30 हजार 814 जणांनी कोरोनावर मात केली आहे. आतापर्यंत 4 कोटी 2 लाख 47 हजार 902 जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर एकंदर मृत्यूचा आकडा 5 लाख 1 हजार 114 इतका झाला आहे.