नवी दिल्ली : देशात गेल्या 24 तासात कोरोनाचे 44 हजार 059 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तसेच 511 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. नव्या बाधितांपेक्षा डिस्चार्ज मिळणाऱयांची संख्या घटल्यामुळे चिंतेचे ढग गडद झाले आहेत. देशात सध्या 4 लाख 43 हजार 486 सक्रिय रुग्ण आहेत. देशात रुग्ण पुन्हा वाढल्यामुळे आता पुन्हा एकदा चिंताजनक वातावरण निर्माण झाले आहे. देशात आतापर्यंत एकूण 1 लाख 33 हजारहून अधिक कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे. नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार, एकूण पॉझिटिव्ह रुग्णांचा एकूण आकडा हा 91 लाखांच्या पुढे गेलेला आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत देशात एकूण 91 लाख 39 हजार 865 रुग्ण सापडले आहेत. त्यापैकी 1 लाख 33 हजार 738 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
दिल्लीत कोरोनाचे थैमान
दिल्लीत कोरोना विषाणूचा संसर्ग वाढू लागला आहे. कोरोना रोखण्याच्या नियमांचे उल्लंघन झाल्याने दिल्लीतील दोन भागातील बाजारपेठा पूर्णपणे बंद करण्यात आल्या आहेत. दिल्ली सरकारने 30 नोव्हेंबरपर्यंत नांगलोई प्रदेशातील पंजाबी बस्ती आणि जनता बाजारपेठ बंद करण्याचे आदेश दिले. दिल्लीत कोरोनाची तिसरी लाट सुरू आहे. कोविड-19 साथीचे व्यवस्थापन करण्यास दिल्ली नोव्हेंबर महिन्यात फारच पिछाडीवर पडलेली दिसते.