चोवीस तासात 1,647 मृत्यूंची नोंद ः 97 हजार 743 जणांना डिस्चार्ज
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
देशात कोरोनाच्या दुसऱया लाटेचा कहर सध्या सुरूच आहे. नव्या बाधितांची आणि मृतांची संख्या जरी कमी होत असली तरी अजूनही रुग्णवाढ होतच आहे. भारतात शुक्रवारी दिवसभरात 60 हजार 753 नवे कोरोना रुग्ण आणि 1 हजार 647 मृत्यू झाले. तसेच दिवसभरात 97 हजार 743 जण कोरोनामुक्त झाले. सध्या भारतात 7 लाख 60 हजार 19 कोरोना ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. नवे बाधित स्थिर पातळीवर असले तरी मृतांचा आकडा दोन दिवसांपासून दीड हजारपर्यंत खाली आल्याने थोडाफार दिलासा मिळाला आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, आतापर्यंत भारतात 2 कोटी 98 लाख 23 हजार 546 जणांना कोरोनाची बाधा झाली. यापैकी 2 कोटी 86 लाख 78 हजार 390 जण बरे झाले. कोरोनामुळे देशात 3 लाख 85 हजार 137 जणांचा मृत्यू झाला. अजूनही देशात साडेसात लाखांहून अधिक रुग्ण विविध इस्पितळांमध्ये उपचार घेत आहेत. देशात गेल्या 24 तासांत 60 हजार 753 नव्या बाधितांची नोंद झाली. त्यामुळे देशातील उपचाराधीन रुग्णांची संख्या आता 7 लाख 60 हजार 19 वर पोहोचली आहे.
देशात गेल्या 24 तासात 33 लाख 85 नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली. त्यापैकी 29 लाख 13 हजार 219 जणांनी पहिला डोस घेतला. तर दुसरा डोस घेणाऱयांची संख्या 3 लाख 86 हजार 866 इतकी आहे. त्यामुळे लस घेतलेल्या नागरिकांची एकूण संख्या आता 27 कोटी 23 लाख 88 हजार 783 वर पोहोचली आहे.