291 जणांचा मृत्यू- सक्रिय रुग्णसंख्या पोहोचली साडेचार लाखांवर
देशात कोरोनाच्या दुसऱया लाटेने थैमान घातले आहे. गेल्या 24 तासात देशात आजपर्यंतची सर्वाधिक वाढ झाली आहे. 62,258 नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. यंदाच्या वर्षात एकाच दिवसात कोरोना रुग्णांच्या संख्येत झालेली ही सर्वाधिक वाढ आहे. धक्कादायक गोष्ट म्हणजे यापैकी 60 टक्के म्हणजे 36 हजार 902 रुग्ण महाराष्ट्रातील आहेत. महाराष्ट्रासह पंजाब, छत्तीसगड, कर्नाटक, गुजरात आणि मध्यप्रदेश या सहा राज्यांत नवीन कोविड रुग्णांच्या संख्येत दररोज वाढ नोंदवली जात आहे. नवीन प्रकरणांपैकी 79.57 टक्के रुग्ण या सहा राज्यात आहेत.
देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 1 कोटी 19 लाख 08 हजार 910 इतकी झाली आहे. महाराष्ट्रात शुक्रवारच्या सर्वाधिक दैनंदिन नवीन रुग्णांची 36,902 नोंद झाली आहे. त्याखालोखाल पंजाबमध्ये 3,122 तर छत्तीसगडमध्ये 2,665 नवीन प्रकरणे नोंदली गेली आहेत. तसेच देशातील एकूण सक्रिय रुग्णसंख्या आज 4 लाख 52 हजार 647 वर पोहोचली आहे. देशातील आतापर्यंतच्या एकूण रुग्णसंख्येच्या तुलनेत हे प्रमाण 3.8 टक्के आहे. गेल्या 24 तासांत एकूण सक्रिय रुग्णसंख्येचा विचार करता 31 हजार 581 नव्या प्रकरणांची नोंद झाली आहे. देशातील एकूण सक्रिय रुग्णांपैकी महाराष्ट्र, केरळ व पंजाब या राज्यांमध्ये 73 टक्के रुग्ण आहेत.
देशात 16 ऑक्टोबर 2020 नंतर शुक्रवारी सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. 16 ऑक्टोबर 2020 मध्ये सर्वाधिक 63 हजार 371 रुग्ण आढळले होते. तसेच रिकव्हरी रेटमध्येही बदल पाहायला मिळत आहे. गेल्या 24 तासात महाराष्ट्रात 112, पंजाबमध्ये 59, छत्तीसगडमध्ये 22, केरळमध्ये 14 आणि कर्नाटकात 13 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. देशात शुक्रवारी 291 जणांचा बळी गेला असून आतापर्यंतच्या एकूण बळींचा आकडा 1 लाख 61 हजार 240 इतका झाला आहे. तसेच दिवसभरात 30 हजार 386 जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून आतापर्यंत 1 कोटी 12 लाख 95 हजार 23 इतके लोक कोरोनामुक्त झाल्याची आकडेवारी शनिवारी आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली.