दिवसभरात 43,263 नवे रुग्ण : 40,567 डिस्चार्ज : 338 मृत्यू
देशातील कोरोनास्थिती…
- एकूण बाधित : 3,31,39,981
- एकूण डिस्चार्ज : 3,23,04,618
- एकूण मृत्यूसंख्या : 4,41,749
- सक्रिय रुग्णसंख्या : 3,93,614
- एकूण लसीकरण : 71,65,97,428
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
देशातील कोरोनाच्या रुग्णसंख्येत पुन्हा एकदा वाढ झाली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने गुरुवारी सकाळी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासात देशात 43 हजार 263 कोरोनाबाधितांची भर पडली आहे तर 338 जणांना प्राण गमवावा लागला. याचदरम्यान गेल्या 24 तासात 40 हजार 567 जण कोरोनामुक्त झाले आहेत. यापूर्वी बुधवारी 37 हजार 875 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली होती तर 369 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. दरम्यान, देशात आतापर्यंत 71 कोटी 65 लाख 97 हजार 428 जणांना लसीचे डोस देण्यात आले आहेत. तसेच गेल्या चोवीस तासात 86 लाख 51 हजार 701 जणांना लसीचे डोस दिल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.
कोरोना महामारीदरम्यान देशात आतापर्यंत 3 कोटी 31 लाख 39 हजार 981 जणांना संसर्ग झाला आहे. एकंदर रुग्णांपैकी 4 लाख 41 हजार 749 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर 3 कोटी 23 लाख 4 हजार 618 जणांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या देशात 3 लाख 93 हजार 614 इतके रुग्ण उपचाराधीन आहेत.
देशातील दर दिवशीच्या कोरोना रुग्णसंख्येपैकी सर्वाधिक रुग्णसंख्या ही केरळमधून समोर येत आहे. बुधवारी केरळमध्ये 30 हजार 196 नव्या रुग्णांची भर पडली तर 181 जणांचा मृत्यू झाला. बुधवारची कोरोनाबाधितांची ही संख्या देशातील एकूण रुग्णसंख्येच्या 70 टक्क्मयांहून अधिक आहे. तसेच महाराष्ट्रात सध्या 4 हजारांच्या आसपास नवे बाधित सापडताना दिसत आहेत.