चोवीस तासात 2.22 लाख नवीन रुग्ण
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
देशातील कोरोनाची दुसरी लाट हळूहळू कमी होताना दिसत आहे. नव्या कोरोनाबाधितांच्या आकडय़ात रविवारी दिवसभरात घट दिसून आली. देशात रविवारी 2.22 लाख नवीन संक्रमित आढळले. हा आकडा मागील 38 दिवसातील सर्वात कमी आहे. यापूर्वी 15 एप्रिलला 2.16 लाख संक्रमितांची नोंद झाली होती. दिलासादायक बाब म्हणजे या चोवीस तासात 3.02 लाख रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.
आरोग्य मंत्रालयाने नुकत्याच दिलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, रविवारी दिवसभरात 2 लाख 22 हजार 315 नव्या बाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर 3 लाख 02 हजार 544 रुग्ण उपचारानंतर कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. तर, 4 हजार 454 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. म्हणजेच, सक्रिय रुग्ण 84 हजार 683 ने कमी झाले आहेत. देशात सध्या 27 लाख 20 हजार 716 इतके सक्रिय रुग्ण उपचार घेत आहेत. देशातील कोरोनाचा मृत्यूदर 1.13 टक्के आहे. तर रिकव्हरी रेट 88 टक्क्मयांहून अधिक आहे. सक्रिय रुग्णसंख्येत घट होऊन 11 टक्क्मयांहून कमी आली आहे. कोरोना सक्रिय रुग्णांच्या संख्येत जगभरात भारत दुसऱया स्थानी आहे. एकूण कोरोनाबाधितांच्या संख्येतही भारत दुसऱया स्थानी आहे.
एकूण कोरोनाबळी 3 लाखांवर
देशात कोरोनामुळे होणाऱया मृत्यूंचा आकडा वाढताना दिसत आहे. देशात कोरोनामुळे आतापर्यंत मृत्यू झालेल्यांचा आकडा तीन लाखांच्या पार पोहोचला असून दिवसभरात 4 हजार 454 जणांचा मृत्यू झाला आहे. देशात रुग्णांची संख्या कमी होत असली तरी मृत्यूचा आकडा वाढता असल्याने देशापुढील चिंता कायम आहे. आतापर्यंत एकूण 3 लाख 3 हजार 720 रुग्णांचा बळी गेला आहे. जगभरात अमेरिका, ब्राझीलनंतर सर्वाधिक मृत्यू भारतात झाले आहेत. अमेरिकेत 6 लाख आणि ब्राझीलमध्ये 4.48 लाख मृत्यू झाल्याचे आकडेवारीतून दिसून येत आहे.
फक्त एका महिन्यात एक लाख मृत्यू
देशात कोरोनामुळे पहिले एक लाख मृत्यू होण्यासाठी सहा महिने लागले होते. एक लाखांवरुन दोन लाख होण्यास 7 महिने लागले. पण, 2 ते 3 लाख होण्यास फक्त एक महिना लागला. मागच्या वषी 13 मार्चला पहिल्या कोरोना रुग्णाचा मृत्यू झाला होता. यानंतर 14 महिन्यातच 3 लाख रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
लसीकरण-चाचण्या वाढविण्यावर भर
देशभरात 23 मेपर्यंत 19 कोटी 60 लाख 51 हजार 962 जणांचे लसीकरण करण्यात आले आहे. तर रविवारी दिवसभरात 9 लाख 42 हजार 722 जणांचे लसीकरण करण्यात आले आहे. तर आतापर्यंत 33 कोटी 5 लाखांहून अधिक कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. रविवारी दिवसभरात 19.28 लाख कोरोना चाचण्या करण्यात आल्या असून त्याचा पॉझिटिव्हिटी रेट 12 टक्क्मयांहून अधिक आहे.