वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
देशात कोरोना संक्रमितांचा आकडा अजूनही 40 हजारांच्या वरच आहे. कोरोनाने सर्वात जास्त दिल्ली प्रभावित झाल्याचे दिसत आहे. देशात आता कोरोना रुग्णांची संख्या 94 लाखांच्या जवळ पोहोचली आहे. मागील 24 तासात देशात कोरोनाचे 41,810 नवीन रुग्ण सापडले आहेत. तर 496 लोकांना जीव गमवावा लागला. दिवसभरात दिल्लीत सर्वाधिक 4,998 नवीन रुग्ण सापडल्याने संसर्ग पसरण्याचे प्रमाण वाढल्याचे दिसून येत आहे.
आरोग्य मंत्रालयाच्या आकडय़ानुसार, देशात जवळपास 42 हजार रुग्ण सापडल्याने कोरोना संक्रमित रुग्णांची एकूण संख्या 93 लाख 92 हजार 919 झाली आहे. देशात आतापर्यंत 88 लाख 02 हजार 617 लोक रिकव्हर झाले आहेत. कोरोना रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण 93 टक्क्यांच्या आसपास आहे. तर देशात अजूनही 4 लाख 53 हजार 956 सक्रिय रुग्ण आहेत. मागील 24 तासात झालेल्या मृत्यूनंतर देशात मृतांची संख्या वाढून आता 1 लाख 36 हजार 696 झाली आहे.
कोरोनाने सध्या सर्वात प्रभावित दिल्ली दिसत आहे. दिल्लीत शनिवारी कोरोना विषाणूची 4,998 नवी प्रकरणे समोर आली आणि संसर्ग दर 12.90 टक्के राहिला. दिल्लीत मागील 24 तासात आणखी 89 रुग्णांचा मृत्यू झाल्यानंतर एकूण मृतांची संख्या 8,998 झाली आहे. दिल्लीत आता एकूण रुग्णांची संख्या वाढून 5 लाख 61 हजार 742 झाली आहे. दिल्लीप्रमाणेच महाराष्ट्रातही आता अधिक रुग्ण सापडू लागले आहेत.