बेंगळूर/प्रतिनिधी
बेंगळूर शहरी जिल्ह्याने सोमवारी देशभरातील कोरोना लसीकरण अभियानात देशातील सर्व जिल्ह्यांना मागे टाकले. सोमवारी सायंकाळी ७ पर्यंत शहरी जिल्ह्यात २,०९,२५६ जणांना लस देण्यात आली. देशातील सर्व जिल्ह्यांमध्ये हे प्रमाण सर्वाधिक होते. तर इंदूर दुसर्या क्रमांकावर आहे, जेथे २,०१,३३९ जणांना लस दिली आहे. तसेच सोमवारी लसीकरण मोहिमेत मध्य प्रदेश पहिल्या आणि उत्तर प्रदेश तिसर्या क्रमांकावर राहिले.
आरोग्य व वैद्यकीय शिक्षणमंत्री डॉ. के. सुधाकर म्हणाले की, लसीकरणाच्या बाबतीत, बेंगळूर सर्व जिल्ह्यांमध्ये प्रथम आहे तर राज्यांमध्ये कर्नाटक दुसर्या क्रमांकावर आहे. राज्यात एकूण १०.३६ लाख लसी देण्यात आल्या. यासह राज्यात आतापर्यंत एकूण १.९६ कोटी जणांचे लसीकरण झाले असल्याचे मंत्री म्हणाले.
दरम्यान मंत्री सुधाकर यांनी, देशातील सर्व जिल्ह्यांपैकी बेंगळूर देखील एकूण लसींच्या बाबतीत प्रथम क्रमांकावर आहे. आतापर्यंत ५२,८८,६८४ जणांचे लसीकरण झाले आहे, जे देशातील इतर जिल्ह्यांपेक्षा सर्वाधिक आहे.
लसीकरणाबाबत जागरूकता वाढली
मंत्री म्हणाले की या लसीचे महत्व लक्षात घेऊन नागरिकांमध्ये जागरूकता वाढली आहे. सुरुवातीला लोक लसीबाबत शंका उपस्थित करीत होते परंतु हळूहळू हा संशय कमी झाला. मंत्री म्हणाले की लोकांना आता हे समजले आहे की विषाणूंपासून बचाव करण्यासाठी लस हाच एक उत्तम मार्ग आहे.