ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
देशात बुधवारच्या तुलनेत आज गुरूवारी कोरोनाबाधितांची संख्या वाढल्याचे समोर आले आहे. यासह दिलासादायक बाब म्हणजे कोरोनाने बळी जाणाऱ्यांच्या संख्येत घट झाली आहे. तर सलग 17 व्या दिवशी दैनिक पॉझिटिव्हिटी रेट 3 टक्क्यांच्या खाली आला आहे.
गुरुवारी मिळालेल्या ताज्या माहितीनुसार, देशात मागील 24 तासात 45,892 नवे रुग्ण आढळून आले. तर 817 जणांचा मृत्यू झाला. तर बुधवारी हीच संख्या 43 हजार 733 इतकी होती. तर 930 जणांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे देशातील एकूण कोरोनाबाधितांची एकूण संख्या आता 3 कोटी 07 लाख 09 हजार 557 वर पोहचली आहे. तर आतापर्यंत 4,05,028 जणांनी आपला जीव गमावला आहे.
बुधवारी देशात 44 हजार 291 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. तर आतापर्यंत 2 कोटी 98 लाख 43 हजार 825 रुग्ण या आजारातून पूर्णपणे बरे झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या देशात 4 लाख 60 हजार 704 ॲक्टिव्ह कोरोना रुग्ण असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. रिकव्हरी दरात वाढ होऊन हा दर 97.18 टक्क्यांवर पोहचला आहे. देशात आठवड्याचा पॉझिटिव्हिटी रेट सध्या 2.37 टक्के आहे तर दैनिक पॉझिटिव्हिटी रेट 2.42 टक्क्यांवर आहे.
दरम्यान, काल दिवसभरात 33 लाख 81 हजार 671 लसींचे डोस देण्यात आले. तर आतापर्यंत देशातील 36 कोटी 48 लाख 47 हजार 549 जणांना लस देण्यात आली आहे.
आतापर्यंत देशात 42 कोटी 52 लाख 25 हजार 897 नमुन्यांची तपासणी करण्यात आली आहे. त्यापैकी 18 लाख 93 हजार 800 कोरोना चाचण्या बुधवारी (दि. 7 जुलै 2021) एका दिवसात करण्यात आल्या.