ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
भारतात पुन्हा एकदा कोरोना विषाणूचा संसर्ग वेगाने वाढत आहे. दिवसेंदिवस वाढत चाललेली रुग्ण संख्या भीतीदायक आहे. यावर्षी गुरुवारी सकाळी पहिल्यांदाच कोरोनाचे 35 हजार पेक्षा अधिक रुग्ण आढळून आले. तर 172 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
आरोग्य विभागाकडून मिळालेल्या ताज्या आकडेवारीनुसार, मागील 24 तासात 35,871 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. त्यामुळे देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता 1 कोटी 14 लाख 74 हजार 605 वर पोहचली असून, मृतांची संख्या 1 लाख 59 हजार 216 एवढी आहे. आतापर्यंत 3 कोटी 71 लाख 43 हजार 255 जणांना लस देण्यात आली आहे.
बुधवारी दिवसभरात 17,741 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. सध्या देशात 02 लाख 52 हजार 364 ॲक्टिव्ह कोरोना रुग्ण असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 1 कोटी 10 लाख 63 हजार 025 रुग्ण या आजारातून पूर्णपणे बरे झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
आतापर्यंत देशात 23 कोटी 03 लाख 13 हजार 163 नमुन्यांची तपासणी करण्यात आली आहे. त्यापैकी 10 लाख 63 हजार 379 कोरोना चाचण्या बुधवारी (दि.17 मार्च 2021) एका दिवसात करण्यात आल्या.