दिल्लीत भव्य दिवाळी सोहळ्याचे आयोजन
प्रतिनिधी/ पणजी
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीतील त्यागराज स्टेडियमवर आयोजित ’दिल्ली की दिवाली’ सोहळ्यात दिल्लीतील सुमारे दोन कोटी लोकांचे नेतृत्व केले. त्याचबरोबर सर्व दिल्लीकर तसेच भारतीयांच्या शांती आणि समृद्धीसाठी प्रार्थना केली. त्यावेळी त्यांच्या मंत्रीमंडळातील सर्व सदस्य उपस्थित होते.
मुख्यमंत्री केजरीवाल यांनी पत्नी सुनीता यांच्यासह दिवाळी पूजेचे यजमानपद केले. यावेळी रामायणातील दृश्यांचे चित्रण करण्यासाठी लाईव्ह ऍक्टसह प्रकाश आणि ध्वनीचा नेत्रदीपक शो देखील आयोजित करण्यात आला होता.
संपूर्ण दिल्ली मंत्रीमंडळाने अयोध्येच्या प्रतिकात्मक राममंदिरात लक्ष्मी पूजन केले. दिल्ली की दिवाली उत्सवासाठी ’त्यागराज’ स्टेडियमवर राममंदिराची 30 फूट उंच आणि 80 फूट रुंद भव्य अशी प्रतिकात्मक प्रतिकृती उभारण्यात आली होती. कार्यक्रमादरम्यान उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया, पर्यावरणमंत्री गोपाल राय, आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन, वाहतूक मंत्री कैलाश गेहलोत, नागरी पुरवठामंत्री इम्रान हुसेन, समाजकल्याणमंत्री राजेंद्र गौतम, विधानसभा अध्यक्ष रामविलास गोयल, उपसभापती राखी यांच्यासह अन्य आमदार, उच्चपदस्थ मान्यवर आदींची उपस्थिती होती.
प्रसिद्ध गायिका अनुराधा पौडवाल आणि कविता पौडवाल यांनी सुरेल गायनाने कार्यक्रमाची शोभा वाढवली. गीता चंद्रन यांनी गणेश वंदनेतून रसिकांना मंत्रमुग्ध केले. झंडेवालान मंदिराच्या पूजऱयाच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण पूजाविधी करण्यात आले.